लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनाला राज्य सरकारने 75 लाख ते एक कोटी रुपयांचा निधी दिला असता तर गुजरात सरकारने देखील तेवढाच निधी देऊ केला असता. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यामुळे यापूर्वी मंजुर केलेली निधीची मागणी पुर्ण केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केली.यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात डॉ.श्रीपाद जोशी यांनी म्हटले आहे की, गुजरात सरकारने देखील बडोदा साहित्य संमेलनाला 25 लाखांचा निधी दिलेला आहे. परंतु महामंडळाने आधीच राज्य सरकारकडे 75 लाख ते एक कोटी एवढय़ा निधीची मागणी केली होती, आपण ते देण्याचे जाहीर देखील केले असते तर गुजरात सरकारने देखील तेवढा निधी देऊ केला असता. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नसून राज्य सरकारने तातडीने ती मागणी पुर्ण केल्याची घोषणा करावी. जेणेकरून गुजरात सरकारकडेही तशा वाढीव सहाय्याची मागणी करता येईल. कर्नाटक सरकारने त्यांच्या भाषेच्या साहित्य संमेलनासाठी आठ कोटी रुपये निधी दिल्याचे यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे आपणही तातडीने निर्णय घेवून घोषणा करावी अशी मागणीही या पत्रात श्रीपाद जोशी यांनी केली आहे.
साहित्य संमेलनाला एक कोटी निधीची घोषणा करावी मुख्यमंत्र्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:31 PM