नंदुरबार : तळोदा तालुक्यात सिंहसदृश प्राणी दिसून आल्याच्या अफवा दिवसेंदिवस वाढत आहेत. यातून वन विभागाकडून या प्राण्याचा माग काढण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावून तपासणी होत आहे. गुरुवारी पुन्हा सहा ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून पडताळणी करण्याचे काम सुरू करण्यात आले.
तळोदा शहरालगतच्या गुजरात हद्दीतील बहुरूपा शिवारात सिंह दिसून आल्याच्या ‘अफवां’चे पेव फुटले होते. यातून शेतशिवारातील कामेही थांबली होती. प्रत्यक्षदर्शींनी दावा केल्यानंतर सिंहाचा शोध सुरू झाला. परंतु आढळून आलेला प्राणी नर की मादी, याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मात्र संभ्रमित करणारी माहिती दिली जात होती. परंतु या सर्व अफवाच ठरत असल्याचे आता समोर आले असून, बहुरूपा शिवारात लावलेल्या एकाही कॅमेऱ्यात सिंहाची छबी टिपली गेली नाही. विशेष बाब म्हणजे येथे आढळलेले नर-मादी बिबट्याही गेल्या आठवडाभरापासून दिसेनासे झाल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.