>> रमाकांत पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मराठी भाषिक लोकप्रतिनिधी आणि मतदारांचा दबदबा असलेल्या गुजरातमधील नवसारी लोकसभा मतदारसंघात यावेळीही मराठी माणसांचाच बोलबाला आहे. गेल्यावेळी देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार सी. आर. पाटील यावेळी चौथ्यांदा रिंगणात असून, ते विजय होतील का, यापेक्षा मताधिक्याचा विक्रम ते मोडतील का, याचीच चर्चा त्या मतदारसंघात सुरू आहे.
>> गुजरातमधील नवसारी लोकसभा मतदारसंघ २००८ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत अस्तित्वात आला. त्यानंतर २००९ पासून सलग तीनवेळा सी. आर. पाटील हे त्या मतदारसंघातून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रमही त्यांनी गेल्या निवडणुकीत केला.
>> ते २०१४ मध्ये पाच लाख ५८ हजार १२२ मतांनी, तर २०१९ मध्ये सहा लाख ८९ हजार ६६८ मतांनी विजयी झाले होते.
>> यावेळी नवसारी मतदारसंघात एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत भाजपचे सी. आर. पाटील आणि काँग्रेसचे नैंशदभाई भूपदभाई देसाई यांच्यातच आहे.
>> या लोकसभा मतदारसंघात लिंबायत, उधना, चोरयासी, गणदेवी, जालापूर, मजुरा आणि नवसारी, असे एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहेत. सातही ठिकाणी सध्या भाजपचेच आमदार आहेत. त्यातही लिंबायतमधील आमदार संगीता पाटील या महाराष्ट्रीयन आहेत. सी. आर. पाटील हेदेखील खान्देशातीलच जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र असून, गुजरात भाजपचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत.
>> या मतदारसंघात परप्रांतीय मतदारांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यात जवळपास ३० टक्के मतदार हे महाराष्ट्रीयन असून, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातीलही मतदारांचा समावेश आहे. भाजपचा हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.