लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील लोंढरे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीवरील लघु प्रकल्पाच्या दुुरुस्तीचे काम झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या कामासाठी ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केला होता.जयनगर, लोंढरे, कुकावल, कोठली, धांद्रे, मातकूट, बोराळा, धानोरा, निंभोरा या आठ गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी या लघुप्रकल्पातील पाण्याचा उपयोग होता. तसेच जमिनीतील पाण्याची पातळी टिकून राहत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठीही उपयोग होतो. २५ वर्षापूर्वी बांधलेल्या या प्रकल्पाच्या भिंतीची पडझड झाली होती. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठा भिंतीतून झिरपून वाहून जात होता. पावसाळ्यात प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर भिंत तुटून नुकसान होण्याची शक्यताही होत. या भिंतीला पडलेले मोठमोठे भगदाड दुरुस्तीसाठी परिसरातील शेतकरी व महात्मा ज्योतीबा फुले युवा मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी यांनी लगतच्या गावांच्या सरपंच व ग्रामस्थांच्या सहकार्याने संबंधित विभागाला निवेदने देऊन भगदाड पडलेली भिंत दुरुस्त करण्याची मागणी केली होती. पावसाळ्यापूर्वी या मागणीचा सतत पाठपुरावा केल्यानंतर लघुपाटबंधारे विभागाने निविदा प्रसिद्ध करून प्रकल्पाच्या भिंतीला पडलेल्या भगदाड दुरुस्तीचे काम एका खाजगी कंपनीला देण्यात आले होते. संबंधित ठेकेदाराने काम सुरू केले. मात्र हे दुरुस्तीचे काम निकृष्ट असल्याचे लक्षात येताच लगतच्या गावातील सरपंच व ईश्वर माळी यांनी विरोध केल्याने काही दिवस हे काम थांबले होते. लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वास दराडे यांनी ठेकेदाराला तंबी देऊन कामात सुसूत्रता आणण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या लघुप्रकल्पाच्या भिंतीचे दुरुस्तीचे काम चांगल्या प्रतीचे झाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.महिनाभरापासून दुरुस्तीचे सुरू असलेले काम शुक्रवारी पूर्ण झाले. त्यामुळे शेतकºयांनी भिंतीजवळ श्रीफळ वाढवून समाधान व्यक्त केले. या वेळी महात्मा ज्योतीबा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक घनश्याम माळी, पोलीस पाटील शांतीलाल रोकडे, धांद्रेचे सरपंच शिवदास चित्ते, उपसरपंच चतुर पाटील, जयनगरचे सरपंच अंकुश सोनवणे, निंबोराचे सरपंच रामचंद्र ठाकरे, सजन मोरे, ठेकेदार भगवान पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.लघुप्रकल्पाच्या भिंतीला मोठे भगदाड पडल्याने पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यास भिंत तुटून आठ गावांना व शेतीचे मोेठे नुकसान होण्याची शक्यता होती. या लघुप्रकल्पाची दुरुस्ती व्हावी यासाठी शेतकºयांसोबत ‘लोकमत’नेही सतत वृत्त देऊन पाठपुरावा केला होता. या वृत्तांची संबंधित विभागाने वेळोवेळी दखल घेऊन प्रकल्पाची दुरुस्ती केली. त्यामुळे निंभोरा, धांद्रे, मातकूट, बोराळा, धानोरा यासह परिसरातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ व शेतकरी यांनी ‘लोकमत’च्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पाची भिंत दुरुस्तीचे काम पूर्णत्वास आल्याचे सांगून कौतुक केले.
लोंढरे लघुप्रकल्प दुरुस्तीचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:50 PM