लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सीआयडी असल्याची बतावणी करून एकाची लूट केल्याची घटना नंदुरबार शहरात घडली आहे. भर दुपारी बसस्थानक परिसरातील गजबजलेल्या चाैकात घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.शहरातील दादावाडी परिसरात राहणारे ७० वर्षीय व्यापारी खेतमल मिश्रीलाल जैन हे सोमवारी दुपारी दुचाकीने बसस्थानक परिसरातून डीआर हायस्कूलकडे जात असताना महाराणा प्रताप पुतळ्याच्या पुढे अज्ञात व्यक्तीने त्यांना हात देऊन थांबविण्याचा इशारा केला. जैन यांनी थांबून विचारणा केल्यावर हिंदी भाषेत सीआयडी असल्याचे सांगून, चेकिंग सुरू असल्याने तुमचीही तपासणी करायची असल्याचा बनाव केला. दरम्यान, दोघांनी जैन यांच्या अंगावरील ५० ग्रॅम सोन्याची साखळी, चार ग्रॅमची अंगठी, मोबाइल व खिशातील डायरी रुमालात बांधवायाचे सांगून डिक्कीत ठेवण्याची सूचना केली. यानंतर अंगझडती घेण्याच्या बहाण्याने एकाने डिक्कीत ठेवलेल्या रुमालाचे गाठोडे काढून घेतले. दोघेही निघून गेल्यानंतर जैन हेही दुकानाकडे निघून गेले. त्याठिकाणी तपासणी केली असता, रुमालात बांधलेला सुमारे तीन लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाणे गाठत हा प्रकार कथन केला. याबाबत खेतमल जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तोतयांविरोधात गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात भरदुपारी घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सीआयडी असल्याचे सांगून व्यापा-याला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 4:06 PM