Maharashtra Assembly Election 2024 : नंदुरबार : जिल्ह्यातील नवापूर, नंदुरबार व अक्कलकुवा मतदारसंघात एकाच घराण्याकडे सत्ता राहिल्याचे चित्र आहे. आता शहादादेखील त्या मार्गावर असून, या मतदारसंघात सलग दोन निवडणुकांत एका घरात आमदारकी राहिली आहे. नंदुरबार जिल्ह्यात चार मतदारसंघ आहेत. त्यापैकी तीन मतदारसंघांत अपवाद वगळता एकाच घराण्याकडे सत्ता राहिली आहे. तिन्ही मतदारसंघांत तिन्ही आमदारांनी डबल हॅट्ट्रिक साधली आहे. हाही एक प्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल.
नवापूरमध्ये नाईकनवापूर मतदारसंघ हा आजवर काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. १९८२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीपासून या मतदारसंघात सुरूपसिंग नाईक यांनी प्रतिनिधित्व केले आहे. सलग आठ वेळा सुरूपसिंग नाईक येथून निवडून आले होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र शिरीषकुमार नाईक यांच्याकडे सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आहे. एकंदर पाहता तब्बल नऊ टर्म नाईक घराण्याकडे या नवापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राहिले आहे.
नंदुरबारमध्ये गावित नंदुरबार मतदारसंघामध्येही एकाच घराण्याकडे सातत्याने आमदारकी राहिलेली दिसून येते. येथे सलग सहा टर्म डाॅ. विजयकुमार गावित यांच्याकडे प्रतिनिधित्व आहे. त्यापूर्वी तीन टर्म त्यांचे सासरे आर. पी. वळवी यांच्याकडे या मतदारसंघाची आमदारकी होती. अर्थात नऊ टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे वळवी-गावित कुटुंबांकडे आहे.
अक्कलकुवा, शहाद्यात पाडवी अक्कलकुवा मतदारसंघात ॲड. के. सी. पाडवी हे सलग सात वेळा निवडून आले आहेत. पूर्वीचा धडगाव व नंतर अक्कलकुवा असे या मतदारसंघाचे स्वरूप राहिले आहे. ॲड. के. सी. पाडवी हे १९९०च्या निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर सलग सात टर्म ते या मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. शहादा मतदारसंघही दोन टर्मपासून पाडवी कुटुंबाकडे आहे. २०१४च्या निवडणुकीत उदेसिंग पाडवी हे निवडून आले होते, तर २०१९च्या निवडणुकीत त्यांचे पुत्र राजेश पाडवी या मतदारसंघातून निवडून आले आहेत.