नंदुरबार : राज्यात कुपोषणाच्या बाबतीत सर्वात संवेदनशील असलेल्या जिल्ह्यातच प्रशासन कुपोषणाचे प्रमाण कागदावरच कमी होत असल्याचे चित्र उघड झाले आहे. यासंदर्भात जिल्हाधिका:यांच्या आदेशानुसार नव्याने झालेल्या कुपोषित बालकांच्या सव्रेक्षणात अतिकुपोषित बालकांच्या आकडेवारीत साडेचार पटीने वाढ झाली आहे.सातपुडय़ातील कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न राज्यातच नव्हे तर देशात गाजले आहेत. येथील कुपोषित बालकांची संख्या आणि बालमृत्यूचे प्रमाण राज्यात जास्त येत असल्याने गेल्या काही वर्षापासून कुपोषित बालकांची संख्या आणि बालमृत्यू कागदावरच कमी केले जात असल्याचा संशय वेळोवेळी व्यक्त झाला आहे. गेल्या 15 वर्षापूर्वी राज्यातील सरासरी बालमृत्यूचे प्रमाण त्याकाळी 48 असताना नंदुरबार जिल्ह्यातील हे प्रमाण केवळ 21 दाखविण्यात आले होते. त्या वेळी संशय व्यक्त झाल्याने शासनाने दखल घेतली आणि नव्याने सव्रेक्षण झाले तेव्हा ते प्रमाण 21 वरून 53 वर गेले होते. सध्यादेखील चित्र यापेक्षा वेगळे नाही.यावर्षी एप्रिल 2018 मध्ये जिल्ह्यातील अतिकुपोषित बालकांची संख्या केवळ 829 होती. प्रशासनानेच यासंदर्भातील वेळोवेळी दिलेल्या अहवालात आकडेवारीत फारसा बदल दिसून येत नव्हता. मात्र प्रत्यक्षात कुपोषणाचे प्रमाण जिल्ह्यात जास्त असल्याच्या तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी कुपोषित बालकांचे नव्याने सव्रेक्षण करून वास्तव अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे सव्रेक्षण करण्यात आले आहे. या सव्रेक्षणानुसार जवळपास साडेचार पटीने कुपोषित बालकांची संख्या वाढली आहे.एप्रिल 2018 मध्ये धडगाव तालुक्यातील अतिसंवेदनशील कुपोषित बालकांची संख्या 409 होती. ती आता एक हजार 175 झाली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील संख्या 190 होती ती आता 716 झाली आहे. तळोदा तालुक्यातील संख्या 83 होती, ती नवीन सव्रेक्षणात 627 झाली आहे. शहादा तालुक्यात संख्या केवळ 59 होती ती आता 754 झाली आहे. नवापूर तालुक्यात अतिकुपोषित बालके एप्रिल 2018 केवळ 21 होती ती आता 280 झाली आहेत तर नंदुरबार तालुक्यात ही संख्या 67 होती ती आता 135 झाली आहे. यातही काही केंद्रांचे सव्रेक्षण बाकी आहे. एकूणच एप्रिल 2018 मध्ये अतिकुपोषित बालके 829 होती ती नवीन सव्रेक्षणात तीन हजार 687 झाली आहे.
नंदुरबारातील कुपोषण कागदावरच कमी होत असल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 1:29 PM