लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी व कुपोषणांतर्गत सॅम व मॅम बालकांच्या शोध मोहिमेसाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. याचअंतर्गत स्थलांतरित मजुरांच्या बालकांचीही स्वतंत्र यादी तयार करण्यात येणार असल्यामुळे कुपोषणाच्या योजना राबवितांना त्यात सुटसुटीतपणा राहणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात सद्य:स्थितीत 829 सॅम व 4,716 मॅम बालके आहेत.केंद्र शासनाच्या नीती आयोगानुसार जिल्ह्याची आकांक्षित जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याअंतर्गत 2018 ते 2022 या कालावधीत जिल्ह्याची आरोग्य व पोषण निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. याच अंतर्गत 17 मे ते 5 जून या कालावधीत ही मोहीम आखण्यात आली आहे. अधिका:यांना मार्गदर्शनमोहिमेअंतर्गत 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी मोहीम व सॅम आणि मॅम बालकांच्या शोध मोहिमेसाठी गाव व पाडेनिहाय सूक्ष्म नियोजन तयार करण्यात आले आहे. नुकतीच जिल्हास्तरावरील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर 14 मे रोजी तिन्ही तालुक्यात सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, महिला बालविकास विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली. गंभीर तीव्र कुपोषित अर्थात सॅम व मध्यम तीव्र कुपोषित अर्थात मॅम बालकांना प्राधान्यक्रमाने आरोग्य व आहार सेवा देणे गरजेचे असते. या बालकांपैकी ज्या बालकांचे वजन त्यांच्या लांबी व उंचीच्या प्रमाणात मर्यादेपेक्षा कमी असते अशा गंभीर तीव्र कुपोषित बालकांना साधारण बालकांच्या तुलनेत मृत्यूचा धोका दहा पटीने जास्त असतो. म्हणून अशा बालकांना विशेष आरोग्य व आहार या सेवा प्राधान्याने देऊन बालमृत्यूदर कमी करता येतो. या धर्तीवर जिल्ह्यातील मोलगी या अतिदुर्गम आदिवासी भागात ग्रामीण रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्राची सुरुवात गेल्यावर्षी 17 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली होती. या केंद्रात वर्षभरात एकुण 161 गंभीर तीव्र कुपोषित बालकांवर उपचार करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्रातील एकमेव पोषण पुनर्वसन केंद्र आहे जेथे परसबाग तयार करण्यात आलेली असून या परसबागेतून मिळणा:या भाजीपालाद्वारे वेगवेगळ्या पाककृती मातांना शिकविण्यात येतात.
अभियानाद्वारे नंदुरबारात कुपोषण शोध मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:58 PM