धडगाव : वैयक्तिक शौचालय बांधकामाची कमी मिळालेली रक्कम, पेसा, चौदावा वित्त आयोगअंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या कामांच्या चौकशीसाठी मांडवी बुद्रुक, ता.धडगाव येथील ग्रामस्थांनी धडगाव पंचायत समितीसमोर गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, येथील गटविकास अधिका:यांनी बुधवारी आंदोलकांची भेट घेऊन याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आंदोलकांनी लेखी पत्र देण्याचा आग्रह धरल्यामुळे हे आंदोलन गुरुवारीदेखील सुरूच होते.धडगाव तालुक्यातील मांडवी बुद्रुक येथे ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयांची कामे घेण्यात आली आहेत. परंतु शौचालय बांधकामाची रक्कम ग्रामपंचायतीने संबंधित लाभार्थीना अपूर्ण दिली आहे. 150 लाभार्थीना 10 हजार तर 130 लाभार्थीना आठ हजार रुपयांची रक्कम देण्यात आली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वास्तविक एक शौचालय बांधकामाची रक्कम 12 हजार रुपये असताना संबंधितांना कमी रक्कम का दिली? असा सवाल उपस्थित करून पाच टक्के ‘पेसा’चा निधी व चौदावा वित्त आयोगातील कामांच्या खर्चामध्येही मोठा अपहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत गटविकास अधिका:यांबरोबरच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका:यांकडेही चौकशी करण्याची मागणी करूनही त्यावर ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ धडगाव पंचायत समितीसमोर सोमवारपासून उपोषणास बसले आहेत. बुधवारी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोढरे यांनी उपोषणार्थीची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत चर्चाही केली. त्यांनी शौचालय बांधकामाची बाकी असलेली रक्कम तातडीने देण्याची हमी घेतली. परंतु पेसा व वित्त आयोगाच्या खर्चाचे लेखी पत्र द्यावे, असा आग्रह आंदोलकांनी धरला. परंतु लेखी पत्र न मिळाल्यामुळे आदोलकांचे उपोषण गुरुवारीही सुरूच होते. कामांच्या चौकशीसाठी स्वतंत्र कमिटी स्थापन करण्याचे आश्वासन गटविकास अधिका:यांनी दिले होते. परंतु आंदोलक आपल्या मागणीबाबत ठाम होते. या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य नटवर पावरा, जोरदार पाडवी, अनिल पटले, सुरेश वळवी, शांतीलाल पावरा, चेतन साळवे, अमिताभ वळवी, जयराम पावरा, वीरसिंग पावरा, गणेश वळवी, शैलेंद्र वळवी, वन्या पाडवी, तेरसिंग वळवी, दिनकर वळवी, गिना पाडवी, वसा वळवी, जोमा वळवी, गोरख पटले आदींसह 150 ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
मांडवी ग्रामस्थांचे उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:44 PM