लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार पालिकेच्या उपनगराध्यक्ष व स्विकृत नगरसेवकांची मुदत संपत असल्याने नवीन निवडीसाठी ३१ डिसेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्ताधारी माजी आमदार रघुवंशी गटातील तीन तर विरोधी भाजप अर्थात डॅा.रवींद्र चौधरी गटातील एका सदस्याची स्विकृत म्हणून निवड होणार आहे. उपनगराध्यक्षपदासाठी देखील सत्ताधारी गटात रस्सीखेच असून कुणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागून आहे. नंदुरबार पालिकेतील सत्ताधारी व विरोधी गटातर्फे प्रत्येकी एका वर्षासाठी स्विकृत नगरसेवकाची निवड केली जाते. गेल्या वर्षी निवड करण्यात आलेल्या चारही सदस्यांची मुदत ३० डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी नवीन सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. याशिवाय सत्ताधारी गटातर्फे उपनगराध्यक्षपद देखील प्रत्येकी एका वर्षासाठी देण्यात येते. त्यामुळे या पदाची मुदत देखील संपली आहे. त्या पदावर देखील निवड करण्यात येणार आहे. नंदुरबार पालिकेत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाची सत्ता आहे. रघुवंशी हे आता शिवसेनेत असले तरी त्यांच्या गटाच्या नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक हे कॅांग्रेसतर्फे निवडून आले आहेत. त्यांच्या गटाला त्यावेळी शिवसेनेच्या पाच सदस्यांची देखील साथ मिळाली आहे. अर्थात युती म्हणूनच त्यांनी निवडणूक लढविली आहे. उपनगराध्यक्ष कुणाची वर्णीउपनगराध्यक्ष पदासाठी यावेळी देखील अनेकजण इच्छूक होते. परंतु येत्या दोन वर्षात पालिकेच्या होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता त्या दृष्टीने उपनगराध्यक्षपदासाठी निवड होणार आहे. या पदासाठी शिष्टमंडळ घेऊन गेेलेल्या नगरसेवकाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. समाज फॅक्टर देखील त्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. सद्या दोन नावे चर्चेत आहेत. स्विकृतसाठीही काही नावे निश्चितसत्ताधारी व विरोधक यांच्यातर्फे अनेकजण इच्छूक होते. सत्ताधारी गटातर्फे तीन व विरोधकांतर्फे एका सदस्यांची निवड होते. सत्ताधारी गटातर्फे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निवडणुकीच्या वेळी अनेकांना शब्द दिले होते. त्यानुसार तसेच प्रत्येक समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे यादृष्टीने निवड केली जाते. त्यानुसार यावेळीही स्विकृत नगरसेवकांची निवड केली जाणार असल्याचे स्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार रघुवंशी व सेना गटातर्फे चौधरी समाज, सोनार समाज व मुस्लिम समाजाला प्रतिनिधीत्व देण्यात येणार असून जवळपास नावेही निश्चित झाली आहेत. तर विरोधी डॅा.रवींद्र चौधरी गटातर्फे जैन समाजाला प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. ३१ रोजी होणार निवड स्विकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष यांची निवड ३१ रोजी होणार आहे. त्याचदिवशी अर्ज दाखल करणेसह निवड प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे. दुपारी त्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन... २०२२ मध्ये होणा-या पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच उपनगराध्यक्ष आणि स्विकृत नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे. जात, समाज यांना देखील प्राधान्य दिले जात आहे. अर्थात सत्ताधारी गटातर्फे निवडणुकीत तसे आश्वासने देण्यात आली होती. त्या नुसार हे पदे संबधितांना आतापर्यंत दिले गेल आहेत.
नगरपालिकेत सर्वच इच्छुकांना निवडणूक लढविता येत नाही. त्यामुळे प्रत्येक समाजाला आणि घटकाला नगरसेवकपद मिळावे यासाठी गेल्या दोन ते तीन टर्मपासून सर्वांना सामावून घेतले जाते. उपनगराध्यक्षपदासाठी दोन टर्म आता पुरुषांना संधी दिली जाणार आहे. नगराध्यक्ष महिला व उपनगराध्यक्षही महिला असल्यास सार्वजिनक कार्यक्रम, शासकीय कामकाज यासाठी अडचणी येतात. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे.. -चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार तथा सत्ताधारी गटाचे नेते, नंदुरबार पालिका.