नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांसाठी गेल्या आठ दिवसांपासून मध्य प्रदेशातील चिखलदा या गावी सुरू केलेले बेमुदत उपोषण धारचे जिल्हाधिकारी प्रियंक मिश्र व आयुक्त दीपक सिंह यांच्या आश्वासनानंतर शनिवारी मागे घेतले. दरम्यान, आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी गेल्या १५ जूनपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. या आंदोलनाच्या समर्थनासाठी शेकडो नागरिक आंदोलनस्थळी धरणे आंदोलनही करीत होते. शुक्रवारी मेधा पाटकर यांची प्रकृती अधिक खालावली होती. शनिवारी धारचे जिल्हाधिकारी प्रियंक मिश्र यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मेधा पाटकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी आंदोलकांतर्फे सर्वोच्च न्यायालयातील आंदोलनाचे वकील संजय पारीख हे उपस्थित होते. तसेच विभागीय आयुक्त दीपक सिंह हे देखील ऑनलाइनने चर्चेत सहभागी झाले. यावेळी संजय पारीख यांनी प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच स्पष्टपणे माहिती दिली आहे. असे असतानाही त्याचे पालन केले गेले नाही. त्यामुळे शेकडो बाधितांना दरवर्षी नुकसानीला सामोरे जावे लागते. यासह अनेक बाधितांवर अन्याय होत आहे. आंदोलकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी मिश्र व आयुक्त सिंह यांनी स्थानिक स्तरावरील सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच जे विषय धोरण आणि उच्च स्तरावरचे आहेत तसेच सरकारच्या अखत्यारीत आहेत त्यासंदर्भात आपण शासनाकडे सविस्तर अहवाल पाठवू, असे आश्वासन दिल्यानंतर मेधा पाटकर यांनी आपले उपोषण मागे घेतले. दरम्यान, उपोषण मागे घेताच मेधा पाटकर यांना बडवाणी येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या आश्वासनानंतर मेधा पाटकर यांचे उपोषण मागे
By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: June 22, 2024 7:00 PM