शहादा : शहरातील एनआरआय व्हीला, मलोणी शिवार व नवीन वसाहतींमध्ये चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत महसूल व पोलीस प्रशासनाची येथे बैठक घेण्यात येऊन उपाययोजना आखण्यात आल्या.बैठकीला प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, डीवाय.एस.पी. महारू पाटील, तहसीलदार मनोज खैरनार, पोलीस निरीक्षक संजय शुक्ल, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ.किशोर पाटील, शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाळे, अतुल जयस्वाल, लक्ष्मीकांत वसावे, एनआरआय व्हीलाचे संचालक शरद पाटील व परिसरातील वसाहतींमधील नागरिक उपस्थित होते. बैठकीत आमदार पाडवी म्हणाले की, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले व परतीच्या पावसानेही निराशा केल्याने खरीप हंगाम शेतक:यांच्या हातातून गेला आहे. या परिस्थितीचे भविष्यात वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. घरफोडी, चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जनता व पोलिसांमधील समन्वय आवश्यक आहे. दोघांनी एकमेकांना सहकार्य केले तर या घटनांना निश्चितच आवर घालता येऊ शकणार आहे. नागरिकांनी आपल्या वसाहतीत वस्तू विक्री करणारे, भंगार विक्रेते व अज्ञात व्यक्तीबाबत संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे सांगितले. डीवाय.एस.पी. पाटील म्हणाले की, पोलीस व जनता यांच्यातील संपर्क व संवाद चोरीच्या तसेच गुन्हे घातपाताच्या घटना थांबवू शकतो. जनतेचे संरक्षण हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य असून जनतेनेही पोलिसांना सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. पोलीस निरीक्षक शुक्ल म्हणाले की, येणा:या काळात चोरीच्या घटनांना आवर घालण्यासाठी सर्वानी जागरुक राहणे गरजेचे आहे. शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता चारही बाजूंनी रस्ते असल्याने रस्ता बंद करणे अवघड होते. येत्या काळात शहरातील नवीन वसाहतींमध्ये ग्रामसुरक्षा दल तयार करण्याची गरज आहे. ज्या वसाहती ग्रामसुरक्षा दल तयार करतील त्यांना एक पोलीस काठी, एक बॅटरी व शिटी दिली जाणार असल्याचे शुक्ल यांनी सांगितले.बैठकीला एनआरआय व्हीला, शारदा कॉलनी, तराई पार्क, ड्रीम सिटी, आयोध्यानगरी, ओमशांतीनगर यासह परिसरातील वसाहतीतील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.रमेश पाटील यांनी तर आभार शरद पाटील यांनी मानले.
चोरीच्या घटना रोखण्यासाठी शहादा येथे बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:45 PM