मनोज शेलार
नंदुरबार : गेल्या दोन दिवसांपासून गारठ्यात वाढ झाली असून किमान तापमान आठ अंशाखाली गेले आहे. सातपुड्याच्या डोंगराळ भागात तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. यामुळे मात्र रब्बी पिकांना हे वातावरण लाभदायी ठरणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केेले.
यंदाच्या हिवाळ्यात अपेक्षित गारठा जाणवलाच नाही. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला किमान तापमान ७ अंशांवर गेले होते. त्यानंतर मात्र थंडी जाणवली नाही. ढगाळ वातावरण, पावसाचा शिडकावा आणि त्यामुळे वाढलेली आर्द्रता परिणामी थंडीचे प्रमाण कमी झाले होते. यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांना फटका बसला होता. थंडीचे प्रमाण वाढावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत होती. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन थंडीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. उत्तरेकडून वाहणारे थंड वाऱ्यांमुळे जिल्ह्यात थंडी वाढल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
जानेवारी अखेरपर्यंत थंडीचे प्रमाण कायम राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. नंदुरबारचे गुरुवारचे किमान तापमान ७.९ अंश सेल्सियस नोंदले गेले. कमाल तापमान २९ अंश होते. सातपुड्यातील डोंगराळ भागात सपाटी भागापेक्षा कमी अर्थात ७.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सातपुड्याचे उंच ठिकाण असलेले तोरणमाळ व डाब येथेदेखील थंडीचा कडाका वाढला आहे. डोंगराळ भागात पहाटे दवबिंदूचे प्रमाणदेखील अधिक राहत आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत धुकेदेखील राहत असल्याचे चित्र आहे.