आज संपूर्ण जग कोरानाच्या प्रभावाखाली आहे. सर्वच बाजूने त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील घटक सर्वच आपआपल्या परीने मदत करीत आहेत. संसर्ग होऊ नये म्हणून विलगीकरणासाठी दिलेल्या सूचना पाळण्यासाठी नागरिकही मदत करीत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून माध्यमातील बातम्या आणि कोरोनाची घेतलेली भीती, २४ तास घरात बसून राहण्याची सक्ती यामुळे मानवी मनावर एक प्रकारची अस्वस्थता दिसून येत आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री वा जागतिक आरोग्य संघटना आाणि इतर जबाबदार घटकांच्या आवाहनास प्रतिसाद देऊनही काही प्रमाणात लोक नियम पाळताना दिसत नाहीत. त्यासाठी काही छोट्य गोष्टी धारण केल्यास मानवी मन निश्चित सशक्त होऊन लढण्याची मानसिकता तयार होईल.आरोग्य जपण्यासाठीचे सर्व नियम तंतोतंत पाळणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. त्याचबरोबर तीन गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिल्यास हा प्रश्न लवकर मार्गी लागेल आणि त्या म्हणजे संयम, नियम आणि अनुशासन होय. जवळपास सर्वच धर्मात, आध्यात्मिक संप्रदायात, संतसाहित्यात संयमास अतिशय महत्वाचे स्थान आहे. भारतीय माणूस समाजप्रिय, समाजात मिसळणारा आहे. त्यास उत्सव, सण, परंपरा, रुढी आदीमध्ये रमून जाण्याची आवड आहे. शिवाय स्वभावात सतत काम करण्याची सवय असणाऱ्यांसाठी २४ तास घरात बसणे अवघड होत आहे. त्यामुळे अशावेळस संयम दाखविणे अत्यंत महत्वाचे आहे. संयम हा गुण लगेच आत्मसात करता येत नाही. त्यासाठी प्रदीर्घ अभ्यास लागतो मात्र ते कठीण अजिबात नाही. प्रयत्न केल्यास संयमित जीवन जगता येते आणि ते अवलंबून आहे दुसºया सूत्रांवर अर्थात नियमावर. म्हणून कोरोनाच्या लढाईत जिंकण्यासाठीचे दुसरे सूत्र म्हणजे नियम होय. काही नियम शासन, प्रशासनाने आखून दिले आहेत त्याचे तर पालन करावे पण आपल्या मनोबलास वाढविण्यासाठी काही छोटे-छोटे नियम तयार करावेत. जसे सकाळ-संध्याकाळ योगासने, प्राणायाम, ध्यान-धारणा अथवा आपल्या इष्ट देवाची, प्रार्थना, प्रेअर, नमाज जे काही आपण करतो तो. संयम, नियम याच्या जोडीला तिसरे सूत्र म्हणजे अनुशासन हा गुण होय. अनुशासन अर्थात शिस्त. घराबाहेर न पडणे, मास्क लावणे, हात धुणे या गोष्टी शिस्तीच्याच घटक आहेत. शिस्त हा गुणांची धारणा केल्यास निश्चित आपण यापासून लढू शकू. तेव्हा संयम, नियम आणि अनुशासन या त्रिसूत्रीच्या आधारे आपण कोरोनाशी लढू शकू.-ब्रह्माकुमारी मिनाक्षी दीदी, उपक्षेत्रीय निर्देशिका, प्रजापिता ब्रह्माकुमारीईश्वरीय विश्वविद्यालय, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, नंदुरबार.
संयम, नियम व अनुशासन हीच कोरोनाशी लढण्याची त्रिसूत्री...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:23 PM