नंदुरबार : अक्कलकुवा शहरातील मोलगी चाैफुली परिसरात मोकाट गुरांचा जाच वाढला आहे. महामार्गावर दुभाजकांमध्ये ही गुरे बसून रहात असतात. यातून वाहतूकीची कोंडीही होत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. शहरातील बाजारपेठांमध्ये मोकाट गुरे फिरत असल्याने नागरीक दर दिवशी हैराण होत आहेत.
महाराष्ट्र हद्दीतील रस्त्याची दुरवस्था
नंदुरबार : तळोदा ते अक्क्लकुवा दरम्यान नळगव्हाण फाटा ते गुजरात हद्दीतील डोडवापर्यंतचा रस्त्याची चाळण झाली आहे. गुजरात राज्यातून नंदुरबारकडे जाणारे व येणारे प्रवासी या रस्त्याचा वापर करतात. गुजरात हद्दीपर्यंत एक किलोमीटर अंतरात मोठमोठे खड्डे असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
महिलांसाठीची स्वच्छतागृहे बंदच
नंदुरबार : शहरातील तहसील कार्यालयात महिलांसाठी तयार करण्यात आलेले स्वच्छतागृह निरुपयोगी ठरत आहे. स्वच्छतागृहाचा दरवाजा तुटला असल्याने त्याठिकाणी जाणे सोयीचे नसल्याने महिलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी आहे. स्वच्छतागृहा समोर बंदीस्तर भिंत उभारण्याचीही महिलांची मागणी आहे.
पावसाच्या पाण्यामुळे नागरीक त्रस्त
तळोदा : शहरात पाऊस झाल्यानंतर दुकाने व घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार दरवर्षी होत आहेत. याकडे पालिकेने लक्ष देत गटारी साफ करुन देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा करुनही योग्य पद्धतीने साफसफाई करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.