ग्रामीण भागात बसेस वाढीची मागणी
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद परिसरात तळोदा बसस्थानकातून बस फेऱ्यावाढीची मागणी करण्यात आली आहे. तळोदा येथून डिझेल टंचाईमुळे बसेस सोडण्यात येत नसल्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. विविध कामांसाठी तळोदा येथे जाणाऱ्यांना खासगी वाहनातून धोेकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
दरडींचे योग्य पद्धतीने व्यवस्थाप करावे
धडगाव : तळोदा ते धडगाव रस्त्यावर गेल्या आठवड्यात दरड कोसळून वाहतूक बंद पडली होती. यामुळे धडगाव तालुक्यातील नागरिकांचे हाल झाले होते. चांदसैली घाटात हे प्रकार नित्याचे झाले असून घाटातील रस्त्याचे रुंदीकरण करुन दरडींचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांनी सतत पाठपुरावा करूनही योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सध्या दुर्गम भागात पाऊस सुरूच असल्याने दरडी कोसळून अपघात होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी वर्तवली आहे.