वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा-कुंडी ते होराफळी या घाटसेक्शनच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम अपूर्ण अवस्थेत असून घाटसेक्शनचा रस्ता असतानाही आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंत बांधलेल्या नाहीत. पावसाळ्यात जागोजागी कोसळलेली रस्त्यावरील दरड ‘जैसे थे’ पडून असल्याने वाहनधारकांना गैरसोयीचे ठरत असून हा रस्ता वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे.मोरंबा-कुंडी ते होराफळी रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा पाणी निघण्यासाठी चारी बनविलेली नसल्याने डोगरांचे उतार पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावर चढ-उताराचे मोठमोठे खड्डे पडून वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहेत. खडीकरण व डांबरीकरणाचे काम झाले नसल्याने रस्त्यावरून ये-जा करणा:या वाहनांमुळे उडणारे धुळीचे कण डोळ्यात जाऊन अपघात घडू शकतो. घाटसेक्शनचा रस्ता असतानाही आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंत बांधल्या नसल्याने वाहनधारकांसाठी हा रस्ता धोकेदायक झाला आहे. पावसाळ्यात कोसळलेली दरडदेखील ‘जैसै थे’च असून ग्रामस्थांनी वाहने निघतील असे दगड-गोटे व माती सरकवली. मात्र मोठमोठे दगड तसेच पडून असल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे. संबंधित बांधकाम विभागाच्या अधिका:यांनी याकडे लक्ष देवून रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरणासह आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंतीचे काम चांगल्या दर्जाचे करून वाहनधारकांचे होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी दुर्गम भागातील नागरिकांनी केली आहे.
मोरंबा-होराफळी रस्ता ठरतोय जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 11:36 AM