नंदुरबार : विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा शहरात रामनवमीनिमित्त मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रेस मारुती मंदिरापासून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. रॅलीत शेकडोंच्या संख्येने युवक सहभागीहोते. प्रारंभी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री विजय सोनवणे यांच्या हस्ते मंदिरात पूजा आरती रॅलीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी नगरपालिकेचे गटनेते प्रा.मकरंद पाटील, राजा साळी, माजी नगरसेवक रवींद्र जमादार, रमाशंकर माळी, लाला पाटील, गुड्डू पवार, विक्की तांबोळी, सुभाष परदेशी, दिनेश नेरपगार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. रॅलीत भगवे ध्वज आणि वाहनांवर ठेवलेल्या श्रीरामाच्या प्रतिमांनी लक्ष वेधून घेतले.
ही रॅली दोंडाईचा रोड, कृषी उत्पन्न बाजार समिती, बस स्थानकासमोरून जुने तहसील कार्यालयाजवळूल डोंगरगाव रस्ता मार्गाने लोणखेडा बायपास लोणखेडा गाव, मलोणी रस्ता, खेतिया राेड, पाडळदा चाैफुली, खेतिया चाररस्ता, काजी चाैक, मारवाडी गल्ली, भोई गल्ली, हुतात्मा लालदास चौक या मार्गाने श्रीराम मंदिरापर्यंत काढण्यात आली. श्रीराम मंदिरात आरती होऊन समारोप झाला.रॅलीच्या मार्गावर शहरातील नागरिकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरात गुरुवारी चार वाजेच्या सुमारास हुतात्मा लालदास चाैकातील श्रीराम मंदिरात आरती आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध सजीव देखाव्यांसह युवा भाविक पारंपरिक पोशाखात सहभागी होणार आहेत. श्रीराम मंदिरापासून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेत शहरातील नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेकडून कळवण्यात आले आहे.