तळोदा तालुका व वनक्षेत्रातील बिबट्यांचा शेतशिवारात संचार होण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. यावर अंकुश लावण्यात वनविभाग गेल्या काही वर्षांत कमी पडत आहे. गेल्या महिनाभरात तळोदा शहरवासीयांना तीन ते चार वेळा बिबट्याने अस्तित्त्वाची प्रत्यक्ष जाणीव करून दिली आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले गेले आहेत; परंतु वनविभागाकडून बिबट्याने या भागात शिकार केल्याची कोणतीही खूण समोर न आल्याने कार्यवाही करण्यात आलेली नाही. बिबट्याने एखादा पशु, प्राणी किंवा तत्सम सजीवाची शिकार केल्यानंतर वनविभागाकडून कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. तोवर हा बिबट्या निरुपद्रवी ठरवून दिल्याचे यातून स्पष्ट होत आहे. तळोदा शहरालगतच्या आमलाड रस्ता भागात बिबट्याचा संचार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भागात वसाहती वाढल्या आहेत. यातून या भागातील रहिवाशांना सर्वाधिक धोका आहे. येत्या काळात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावले न गेल्यास नाशिक शहरासारख्या घरांमध्ये बिबट्या शिरण्याचे प्रकार होण्याची मोठी शक्यता आहे.
सिंह नव्हता मग पायाचे ठसे मोठे कसे
गुरुवारी बहुरुपा शिवारातील शेतात प्रत्यक्षदर्शीने सिंह व बिबट्या हे दोन्ही वन्यजीव बसून असल्याचा दावा केला होता. वनविभागाच्या पथकाने याठिकाणी भेट दिल्यानंतर तातडीने घटनेचा आढावा घेण्यासाठी वनविभागाचे पथकही दाखल झाले होते. या पथकाने पायांचे ठसे घेतले होते. यातील एका प्राण्याच्या पायाचे ठसे हे सामान्यापेक्षा मोठे असल्याचे दिसून आले आहे. प्राण्यांच्या पायाचे ठसे त्याच्या वजनावरून समजते. नर बिबट्याचे वजन हे साधारण ७५ किलोपर्यंत असते. त्याची उंची ही चार फुटापेक्षा अधिक नसते. यामुळे त्यांच्या पायाचा ठसा कमी व्यासाचा असतो. मादी बिबट्याचे वजन हे ३४ किलोपर्यंत असू शकते. वयोमानानुसार त्यांचे वजन कमी अधिक असले तरी १२५ किलोपेक्षा अधिक वजनाच्या प्राण्याच्या पायाचे ठसे बहुरुपा शिवारात आढळून आले असल्याचे समोर आले आहे. यामुळे ही घटना वनविभागाने गांभीर्याने घेणे आवश्यक झाले आहे.
वनविभागाकडून शुक्रवारी सकाळी कॅमेरे तपासून पुन्हा लावले असल्याने येत्या दोन दिवसांत निश्चित काय ती माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
याबाबत तळोदा मेवासी वनविभागाचे उपवनसंरक्षक पी. के.बागुल यांना संपर्क केला असता, आढळून आलेले पायाचे ठसे हे सिंहाचे नसावेत; परंतु ट्रॅप कॅमेरे लावून तपासणी करत आहोत. वन्यप्राणी एका ठिकाणी थांबत नसल्याने त्यांचा माग काढणे पावसाळ्यात कठीण जाते.