ब्राह्मणपुरी : कोळदा ते खेतिया रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, शहादा-खेतिया रस्त्यावरील दराफाट्यावर पावसामुळे रस्ता चिखलयुक्त झाला आहे. शहादा ते खेतिया रस्त्यावरील दराफाट्यावर थोडा जरी पाऊस झाला तरी दुचाकी व लहान-मोठी वाहने घसरून अपघात होत आहेत. सध्या या मार्गावर घसरगुंडीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कोळदा-खेतिया महामार्ग रुंदीकरणचा प्रारंभ झाल्यानंतर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात काम झाले आहे. मात्र, उर्वरित दराफाट्यानजीक छोट्या पुलाच्या कामासह जमिनीचे सपाटीकरण व आवश्यक ठिकाणी भर टाकणे अशी कामे सध्या सुरू आहेत. महामार्गाचे काम वेगात सुरू असून, ही समाधानाची गोष्ट आहे. मात्र, रुंदीकरणाच्या कामाच्या ठिकाणी सुसरी धरणातील पाणी शेतशिवारात जाण्यासाठी सिमेंटचे पाईप टाकण्याच्या कामासाठी खड्डा करण्यात आला होता. याला बगल देत मातीमिश्रित रस्ता तयार करण्यात आला; परंतु काम झाल्यावर या रस्त्यावर पावसाळ्याचा दृष्टीने मुरूम टाकणे गरजेचे होते; परंतु संबंधित ठेकेदाराने या मार्गावर मुरूम न टाकल्याने मातीमिश्रित रस्ता राहून दिल्याने वाहन घसरून अपघात होत आहे.
दराफाटा वळणावर चढउतार
शहादा-खेतिया रस्त्यावर दराफाट्याहून एकीकडे धडगाव, तोरणमाळ, म्हसावदकडे हा मार्ग जात असून, मध्य प्रदेशाला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ असते. त्यातच रस्ता रुंदीकरणाच्या ठिकाणी दराफाट्यावर रस्त्याला बगल देत मातीमिश्रित रस्ता तयार करण्यात आला आहे; परंतु हा रस्ता वळणाचा असून, त्याला चढउतार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या वळणावर चढावाची स्थिती असल्याने चिखलामुळे दुचाकीस्वार घसरण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर संबंधित ठेकेदाराने उपाययोजना करून होणारे अपघात थांबवावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.