नंदुरबार : ‘नाच ग घुमा, कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा सोनार नाही आला, जोडवी नाही मला, कशी मी नाचू...’ अशा पारंपरिक लोकप्रिय गीतांवर सुवासिनींना यंदा फेर धरुन नाचण्याच्या आनंदास कोरोनामुळे मुकावे लागणार आहे. दरवर्षी श्रावणात प्रत्येक मंगळवारी मैत्रिणींसोबत महिला विविध खेळ खेळतात.यंदा मात्र कोरोनामुळे महिलांचा हिरमोड केल्याने नंदनगरीत राष्टÑ सेविका समितीतर्फे दर रविवारी युट्युब आणि व्हॉट्सअॅपवर आॅनलाईन मंगळागौर कार्यक्रम सादर करून हिंदू संस्कृती सणांची परंपरा जपली जाईल. श्रावण महिन्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. विविध व्रतवैकल्यांचा म्हणून श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व असून, श्रावण मंगळागौरीच्या खेळांमुळे महिलांना अधिक प्रिय आहे. नवविवाहितांसोबत महिलादेखील एकाहून एक सरस गाणी गाऊन फुघड्या तसेच विविध खेळ सादर करीत आनंद लुटतात. यंदा मात्र कोरोना संकटामुळे समूह पद्धतीने होणारे खेळ थांबले आहेत.एक महिना आधीच आम्ही सगळ्या सख्या एकत्र येऊन खेळांचा सराव करतो. हे खेळ म्हणजे सर्वांग सुंदर व्यायाम असल्याने जिमची गरज नाही. यावर्षी कोरोनामुळे आम्ही एकत्र येऊ शकलो नाही याची खंत वाटते.नंदुरबार शहरात राष्टÑ सेविका समितीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून युवती आणि महिला संघटन शक्तीद्वारे हिंदू धर्मशास्त्रानुसार विविध सण उत्सवांचे महत्त्व आजच्या आधुनिक युगातही कायम राखले आहे हे विशेष!
‘नाच ग घुमा’ यंदा कोरोनामुळे रंगणारच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 12:56 PM