- भूषण रामराजे
नंदुरबार : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील युवकाची सीआयएसएफमध्ये भरती करुन देण्याच्या आमिषाने दोघांनी आठ लाख रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. जून २०२१ पासून हा प्रकार सुरु होता. संग्रामसिंग वामनसिंग रावल असे युवकाचे नाव आहे. संग्रामसिंग याला योगेश संजयसिंग राजपूत (२८) रा. जातोडे ता. शिरपूर व भीमराव बापू पाटील (५०) रा. कर्जत, जि. रायगड यांनी संपर्क करुन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अर्थात सीआयएसएफमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दिले होते. यातून जून २०२१ मध्ये संग्रामसिंग याने योगेश राजपूत व भीमराव पाटील या दोघांना सारंगखेडा आणि शिरपूर येथे दोन टप्प्यात आठ लाख रुपये दिले होते. दरम्यान दोन वर्ष उलटूनही नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे समोर आल्यावर संग्रामसिंग वामनसिंग रावल याने सारंगखेडा पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. याप्रकरणी त्याने दिलेल्या फिर्यादीवरून योगेश राजपूत (२८) व भीमराव बापू पाटील (५०) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान कोळी करत आहेत.