- मनोज शेलार नंदुरबार - जैविक खतांमध्ये भेसळ करून निकृष्ट जैविक खतांचे उत्पादन करून ते विक्री केल्याप्रकरणी हैदराबाद येथील खत कंपनीविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाचे नाशिक विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांनी याबाबत फिर्याद दिली.पोलिस सूत्रांनुसार, नंदुरबार येथील एका कृषी निविष्ठा दुकानात भेसळयुक्त जैविक खते विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती.
त्यानुसार विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांनी नंदुरबारातील बाजार समिती व्यापारी संकुलातील साई कृषी सेवा केंद्र येथे तपासणी केली. तेथे मे. बायोफॅक्ट इनपुट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने त्यांच्या जैविक खतांमध्ये रासायनिक खतांची भेसळ करून जैविक खतांच्या नावाने निकृष्ट दर्जाच्या खतांचे उत्पादन करून ते विक्री केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील गुणवत्ता नियंत्रण अधिकारी उल्हाद प्रल्हाद ठाकूर यांनी फिर्याद दिल्याने मे. बायोफॅक्ट इनपुट कंपनी, हैदराबाद व कंपनीचे उत्पादन अधिकारी दगडा माहेश्वर रेड्डी यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार करीत आहेत.