- मनोज शेलार नंदुरबार - बनावट कागदपत्रांच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र मिळवून सरपंचपदी निवडून आलेल्या खातगाव, ता.नवापूर येथील तत्कालीन महिला सरपंचविरोधात नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, खातगाव, ता.नवापूर येथे सप्टेंबर २०२२ मध्ये ग्रामपंचायत सदस्य व थेट सरपंचपदाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत थेट जनतेतून निवडून येणाऱ्या सरपंचपदासाठी सुमा किसन वळवी उर्फ सुमा पारतु वळवी (३८) यांनी अर्ज दाखल करतांना अनुसूचित जमाती महिला गटातून अर्ज दाखल केला होता. अर्जासोबत लावलेले जातीचा दाखल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्या जातीच्या दाखल्याची पडताळणी करण्यात आली. त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला व इतर कागदपत्रे ही बनावट तयार करून जातीचा दाखला मिळविला. त्यासाठी त्यांनी शपथपत्रही करून दिले. त्यात सर्व कागदपत्रे खरी असल्याचे म्हटले होते. अखेर जातीचा दाखला खोटे दस्ताऐवज तयार करून मिळविला असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे सरपंचपद धोक्यात आले होते. अखेर शुक्रवारी सायंकाळी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी २६ सप्टेंबर २०२२ रोजी खातगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी असलेले तथा मंडळ अधिकारी चंद्रसिंग तुंबड्या नाईक (५२) यांनी फिर्याद दिल्याने सुमा किसन वळवी उर्फ सुमा परंतु वळवी (३८) यांच्याविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार विशाल सोनवणे करीत आहे.