- मनोज शेलार नंदुरबार - उधना-जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम उत्कृष्ट झाले. आता तिसरी लाइन टाकण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. शिवाय अमृत भारत रेल्वेस्थानकांतर्गत खान्देशातील आणखी काही स्थानकांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नंदुरबारात पत्रकारांशी बोलतांना केले. भुसावळ-सुरत मार्गावरील कामांच्या पाहणीसाठी दानवे हे विशेष रेल्वेने जात असताना नंदुरबारात काही काळ थांबले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, पश्चिम रेल्वेच्या ताप्ती सेक्शनवरील उधना-जळगाव हे रेल्वेलाइन महत्त्वपूर्ण आहे. दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर आता तिसरी लाइन बाबत विचार सुरू आहे.
सर्व आवश्यक यंत्रणांचा अहवाल मागवून हा निर्णय घेतला जाईल. अमृत स्थानकांतर्गत पहिल्या टप्प्यात मोजक्याच स्थानकांचा सहभाग आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील विशेषत: खान्देशातील जास्तीत जास्त स्थानके घेण्याचा प्रयत्न असेल. मोदी सरकार आल्यापासून रेल्वेचे बजेट मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याने मागे पडलेल्या कामांना गती देण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली पाचोरा-जामनेर मार्गांवर नवीन रेल्वेमार्ग टाकणार आहे. त्यासोबतच कोल्हापूर ते तुळजापूर, नगरपासून ते बीड-परळीपर्यंत या मार्गांच्या कामांना गती देणार आहोत.
वंदे भारत रेल्वे आतापर्यंत २५ सुरू झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसचा कलर बदलण्यात आला असून, हा कलर महत्त्वाच्या नाही. आता सिटिंगसह स्लिपर कोचदेखील तयार केले जाणार आहेत. लातूर येथे कोच बांधणीची फॅक्टरी सुरू करत असून, त्या ठिकाणी स्लीपर कोचेस तयार केले जाणार आहेत. १०० ट्रेन बनविण्याच्या प्रस्ताव रेल्वे विभागाने दिलेला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.