- मनोज शेलार नंदुरबार - १७ महिन्यात ५ लाख ५७ हजार रुपयांची तब्बल ३६ हजार ६६९ युनिट वीज चोरी केल्याप्रकरणी शहादा येथील एकाविरुद्ध वीज अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रानुसार, शहादा येथील सरस्वती कॉलनीत राहणारे जगदीश पुरुषोत्तम चौधरी (४५) यांनी त्यांच्या घरगुती वापरासाठी घेतलेल्या वीज मीटरमध्ये फेरफार करून १७ महिन्यात तब्बल ३६ हजार ६६९ युनिटची वीज चोरी केली. महावितरणच्या भरारी पथकाने शहाद्यात अचानक तपासणी मोहीम राबविल्यावर चौधरी यांच्या घरगुती मीटरमध्ये फेरफार केेलेली आढळून आली. पथकाने अधिक तपासणी केली असता त्यांना ही वीज चोरी आढळून आली. वीज चोरी केलेले ३६ हजार ६६९ युनिट विजेचे ५ लाख ५७ हजार ६९० रुपयांची वीज असल्याचे स्पष्ट झाले. तडजोड शुुल्क १ लाख ७० हजार असा एकूण ५ लाख ५७ हजार रुपयांची तडजोड रकमेचे बिल देण्यात आले. परंतु विहीत मुदतीत ते देखील जगदीश चौधरी यांनी भरले नाहीत. त्यामुळे मालेगाव येथील भरारी पथकाचे कार्यकारी अभियंता हेमंत यशवंत ठोसरे यांनी फिर्याद दिल्याने जगदीश चौधरी यांच्याविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार संजय ठाकूर करीत आहे.