- मनोज शेलार नंदुरबार - राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी नंदुरबारात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक होणार आहे. शिवाय काही गावांना ते भेट देखील देणार आहेत. दोन दिवसात त्यांचा सविस्तर दौरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार आहे.
राज भवनातून जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यपालांचा ३ नोव्हेंबरच्या दौऱ्याबाबत लेखी पत्र दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने लागलीच तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसह इतर ठिकाणी भेटी असा दौऱ्याचा प्राथमिक व प्रारूप आराखडा मिळाला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने तयारीला वेग दिला आहे. शहरातील शासकीय विश्रामगृहात आवश्यक त्या सुविधा केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी सभागृहाची सज्जता ठेवली जात आहे. राज्यपाल ज्या मार्गाने येतील व जातील त्या मार्गातील खड्डे बुजविणे, गतिरोधक काढणे याला प्राधान्य देण्यात येत आहे. दोन दिवसात अंतिम दौरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.