नंदुरबारमध्ये मुहूर्ताचा खेळ..! भाजपा उमेदवार अर्ज भरायच्यावेळी काँग्रेस उमेदवार दाखल झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 09:19 AM2024-04-23T09:19:03+5:302024-04-23T09:23:41+5:30
मुहूर्त साधण्यासाठी डॉ. गावीत यांनी घाईघाईत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. नेमके त्याचवेळी ॲड. पाडवी हेसुद्धा अर्ज भरण्यासाठी दाखल झाले.
रमाकांत पाटील
नंदुरबार : नंदुरबार मतदारसंघात सोमवारी भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करीत असतानाच, काँग्रेस उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांनीही अचानक येऊन अर्ज दाखल केला. मुहूर्त साधण्यासाठी अर्ज भरल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले असले तरी ही खेळी मुहूर्त साधण्यासाठी की भाजपचा मुहूर्त टाळण्यासाठी, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
नंदुरबार मतदारसंघात भाजपने २२ एप्रिलला, तर काँग्रेसने २३ एप्रिलला अर्ज भरण्याचे यापूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर काँग्रेसने २३ एप्रिलऐवजी २५ एप्रिलला अर्ज भरण्याचे जाहीर केले होते. भाजपतर्फे ठरल्यानुसार सोमवारी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यासाठी पक्षाने मुहूर्त काढला होता. मुहूर्त साधण्यासाठी डॉ. गावीत यांनी घाईघाईत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. नेमके त्याचवेळी ॲड. पाडवी हेसुद्धा अर्ज भरण्यासाठी दाखल झाले.
बंडखोरीचीही रंगली चर्चा
काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार असल्याची चर्चाही सुरुवातीला रंगली; परंतु पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचाच मुहूर्त असल्याने आज अर्ज दाखल केल्याचे सांगितले. तरीही २५ एप्रिलला शक्तिप्रदर्शन करून आणखी एक अर्ज दाखल करणार असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले आहे.