n लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. नेहरू नगर भागातील बालिकेचा कुत्र्याच्या चाव्यामुळे मृत्यू झाला. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनची असतांना देखील त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यानेच बालिकेला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होत आहे. हिताशी महाजन (वय सहा) रा. नेहरूनगर, नंदुरबार असे बाालिकेचे नाव आहे. सहा दिवसांपूर्वी बालिका आपल्या घरासमोर खेळत असतांना मोकाट कुत्र्यांच्या झुंडीत ती सापडली. कुत्र्यांनी तिचे लचके तोडले. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेतांना शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. ठिकठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी दिसून येतात. रात्रीच्या वेळी रस्त्याने चालणे देखील मुश्कील होते. दुचाकी स्वारांच्या मागे लागण्याचे प्रमाण तर अधीक आहे. त्यामुळे अनेकांचा अपघात झाल्याने ते जायबंदी झाले आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनची आहे. परंतु त्याकडे पालिकेने फारसे गांभिर्याने पाहिले नसल्याचे चित्र आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोकाट कुत्र्यांचे निर्बजीकरण आणि त्यांना पकडून जंगलात सोडण्याचा ठराव देखील करण्यात आला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आहे. बालिकेचा बळी गेल्यानंतर आतातरी पालिकेने गांर्भियाने घेत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
नंदुरबारात मोकाट कुत्र्यांनी बालिकेचा बळी घेतल्याने हळहळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 12:30 PM