नंदुरबार : चौकातील सर्कलचे बांधकाम काढण्यासाठी गेलेल्या नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी, बांधकाम अभियंता व पथकाला घेराव घालत, शिविगाळ करून धमकविल्याने सहा जणांविरुद्ध नंदुरबार पोलिसात शासकीय कामात अडथळा आणने व जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार पालिकेतर्फे शहरातील मुख्य चौकातील सर्कलचे अतिरिक्त बांधकाम काढून चौक रहदारीसाठी मोकळा करण्याचे काम सुरू आहे. नवापूर चौफुली, धुळे चौफुली आणि शहादा अर्थात करण चाैफुलीवरील अतिरिक्त बांधकाम काढण्याचे पालिकेने ठरविले आहे. त्यानुसार नवापूर व धुळे चौफुलीचे अतिरिक्त बांधकाम काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यानुसार पालिकेचे पथक करण चौफुलीवरील अतिरिक्त काम पाडण्यासाठी गेले असता जमावाने गैरसमज करून तेथील काम काढण्यास विरोध केला.
पालिकेचे बांधकाम अभियंता गणेश गावित यांना घेराव घालण्यात आला. मुख्याधिकारी तथा प्रशासक पुलकित सिंह यांना बोलाविण्याची मागणी करण्यात आली. मुख्याधिकारी सिंह तेथे आले असता त्यांनाही घेराव घालण्यात आला. आरडाओरड करून, शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद अभियंता गावित यांनी पोलिसात दिली आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी पुलकित सिंह यांना कडे करून शासकीय वाहनात बसवून रवाना केले. त्यानंतर गणेश गावित यांनी शहर पोलिसात जाऊन याबाबत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आठ ते दहा जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, जमाव जमवणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर चौफुलीवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.