रमाकांत पाटील
नंदुरबार : जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे संकट पुन्हा एकदा गडद झाले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ३० आणि ३१ मार्च रोजी तुरळक व हलका तर २ ते ८ एप्रिलदरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच नुकसानीत असलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई आणि जिल्हा कृषी हवामान केंद्र यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार ३० आणि ३१ मार्च रोजी जिल्ह्यात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यावेळी रात्रीचे तापमान १८ तर दिवसाचे तापमान ३६ अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे. या काळात ताशी १५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.
हवामान खात्याने यापुढील अंदाज देताना २ ते ८ एप्रिलदरम्यान मध्य महाराष्ट्रासह जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात सरासरीपेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात पीक सुरक्षित ठिकाणी हलवावे, गहू पिकाची कापणी करावी यासह विविध सूचना शेतकऱ्यांना करण्यात आल्या आहेत.