- भूषण रामराजे
नंदुरबार : शहादा शहरातील जामा मशिदीच्या ट्रस्टी पदावरुन काढल्याच्या वादातून एकावर दोघांनी धारदार शस्त्राने वार करून जखमी करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. रईस शेख रहीम रा. ईकबाल चाैक यांच्यावर हा हल्ला झाला. मंगळवारी रात्री रईस शेख हे जामा मशिदीत असताना त्याठिकाणी कादीर पटवे, हरीश नासिर पठाण, मुप्ती उस्मान इशाती फैज जाकिर पटवे हे हजर होते. यावेळी कादीर आणि हरीश पठाण यांनी मुफ्ती उस्मान याला जामा मशीद ट्रस्टीमधून का काढले यातून वाद घातला होता.
यावेळी रईस शेख हे समजावण्यासाठी गेले असता, कादीर आणि हरीश यांनी हातातील चाकू सारख्या दिसणाऱ्या धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. वार वाचवण्यासाठी शेख यांनी हात पुढे केल्याने त्यांचा पंजा आणि बोटाला दुखापत झाली. यावेळी मुफ्ती उस्मान आणि फैज पटवे या दोघांनी रईस शेख यांना हाताबुक्कीने मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बुधवारी पहाटे रईस शेख रहिम यांनी शहादा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित कादीर पटवे (३५), हरीश नासिर पठाण (३२), मुफ्ती उस्मान इशाती (४८) व फैज जाकिर पटवे (२८) सर्व रा. शहादा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.