नंदुरबार : पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दीपमाला अविनाश भील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.
पंचायत समितीच्या स्व. हेमलताई वळवी सभागृहात गुरुवारी सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार नितीन गर्गे होते. सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या कालावधीत पाटोंदा गणाच्या सदस्या दीपमाला भील यांनी २ नामांकन अर्ज सादर केले. त्यांच्या अर्जावर सदस्य संतोष साबळे यांनी अनुमोदन केले.
त्यानंतर दुपारी ३ वाजता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली. दोन्ही अर्ज वैध ठरवण्यात आल्यानंतर माघारीची मुदत देण्यात आली. त्यात एकमेव असल्याने पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार नितीन गर्गे यांनी दीपमाला भील यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवड प्रक्रियेप्रसंगी विरोधी सदस्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.