लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुले पळविणा:या अफवा सोशल मिडियावर पसरवून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केल्यास संबधितांवर सायबर अॅक्टनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.नंदुरबारसह जिल्ह्यात लहान मुले पळविणारी टोळी कार्यरत असल्याबाबतच्या अफवा पसरविल्या जात आहेत. अशा बाबतीतले फोटो, मेसेज व्हाईरल केले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडलेल्या नाहीत. ज्याही घटना सोशल मिडियावर फिरत आहेत त्या यापूर्वी व इतर जिल्हा व राज्यात घडलेल्या आहेत. अशा प्रकारची टोळी जिल्ह्यात कार्यरत नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. जवळच्या पोलीस ठाण्याची संपर्क साधावा. अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास कायदा हातात न घेता तात्काळ पोलिसांना कळवावे. शिवाय सोशल मिडियावर अशा अफवा पसरविणा:यांवर नंदुरबार सायबर सेल लक्ष ठेवून आहे. संबधितांवर सायबर अॅक्ट अंतर्गत कारवाई देखील करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिला आहे.
मुले पळविणारे टोळीचा मेसेज टाकल्यास नंदुरबार पोलीस करणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 11:59 AM