नंदुरबार : गत दोन दिवसात पोलीस दलाने 200 बैठका घेत नागरिकांची जनजागृती केली आह़े कोतवाल, पोलीस पाटील यांना सोबत घेत दवंडीद्वारे बोलावल्या जाणा:या बैठकीत पोलीस कर्मचारी मार्गदर्शन करत आहेत़ राईनपाडा ता़ साक्री येथील घटनेपूर्वी नंदुरबार जिल्ह्यात म्हसावद ता़ शहादा, शहादा शहर, गडद ता नवापूर यासह ठिकठिकाणी अनोळखी व्यक्तींना मुले पळवणारे समजून मारहाण करण्यात आली होती़ ह्या घटना रोखण्यासाठी पोलीस दलाकडून प्रयत्न सुरू असतानाच राईनपाडा ता़ साक्री येथील घटना घडल्यानंतर पोलीसांनी गांभिर्याने पावले उचलून कारवाई सुरू केली़ यानुसार दोन दिवसांपासून अनोख्या शैलीत कोतवालाकडून दंवडी दिली जात आह़े दवंडीनंतर चौकात गोळा होणारे नागरिक ‘पोलीस दादा’कडून दिली जाणारी माहिती गांभिर्याने ऐकून घेत आहेत़ नंदुरबार शहर, उपनगर, नंदुरबार तालुका, नवापूर, विसरवाडी, शहादा, म्हसावद, सारंगखेडा, धडगाव, मोलगी, अक्कलकुवा, तळोदा या 12 पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या आदेशानुसार बैठकांचे आयोजन करण्यात येत आह़े यात पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि सरपंच यांची समिती बनवून त्यांची मदत घेतली जात आह़े गावोगावी कोपरा सभांमध्ये जाऊन पोलीस ठाण्यातील ज्येष्ठ पोलीस कर्मचारी ग्रामस्थांना माहिती देत आहेत़ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचा:यांचे पथक सातत्याने पोलीस ठाणे क्षेत्रात गस्त घालून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत़ पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी गेल्या आठवडाभरात अक्कलकुवा, तळोदा, धडगाव याठिकाणी सभा घेत पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले आह़े शुक्रवारी त्यांनी शहादा तालुक्यातील पोलीस पाटील, सरपंच व ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक घेत त्यांना अफवा रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली़ग्रामीण भागात अफवांचा प्रसार रोखण्यासाठी कोतवालांकडून दररोज सायंकाळी दवंडी दिली जात आह़े पोलीस दलाकडून ग्रामीण आणि शहरी भागात अफवांना नागरिकांनी बळी पडू नये अशी जागृती करणारे बॅनर तयार केले आहेत़ हे बॅनर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत लावले जात आहेत़ 1 हजार बॅनर लावण्याचे नियोजन पोलीस दलाने केले आह़े बॅनरसोबत बस स्टँड, रेल्वेस्थानक, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणी यासह जागोजागी 10 हजार भित्तापत्रके चिकटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आह़े नंदुरबार आणि शहादा या सर्वात मोठय़ा शहरी हद्दीत अफवा रोखण्यासाठी त्या-त्या पोलीस ठाण्यांकडून रहिवासी वसाहतींमध्ये बैठका घेण्यात येत आहेत़ यात समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना बोलावून त्यांच्याकडून जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आह़े पोलीस दलाकडून शहरी भागात बाहेरगावाहून भिक्षुकी किंवा व्यवसायानिमित्त आलेल्या नागरिकांची माहितीही संकलित करण्यात येणार आह़े
नंदुरबारातील पोलिसांकडून दोन दिवसात 200 बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 12:12 PM