- मनोज शेलार नंदुरबार - जिल्ह्यातील अनेक भागात मंगळवारी रात्री पावसाने हजेरी लावली. शहादा तालुक्यातील तापी पट्ट्यातील गावांमध्ये अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. सारंगखेडा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने यात्रेकरूंची तारांबळ उडाली होती.
दरम्यान, पावसामुळे गारवा निर्माण होण्याऐवजी ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता वाढल्याने तापमानात फारसा फरक पडला नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात सोमवार व मंगळवारी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी काही भागात तुरळक पाऊस झाला होता. मंगळवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते. सायंकाळी मात्र तापी काठावरील अनेक भागात पाऊस झाला. काही ठिकाणी हलका ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होता. सारंगखेडा व परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने या भागात अधिक नुकसान झाले. शिवाय सध्या सारंगखेडा यात्रा सुरू असल्याने यात्रेकरू आणि यात्रेत आलेल्या विविध विक्रेत्यांचीही तारांबळ उडाली होती.
खाद्यपदार्थांसह विविध खेळणी विक्रीच्या दुकानांना याचा सर्वाधिक फटका बसला होता. इतर भागात मात्र तुरळक सरी कोसळल्या. या पावसामुळे गहू, हरभरा या पिकांना फटका बसला. त्यामुळे महिनाभरातील सलग दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस झाल्याने यंदा या दोन्ही पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.