नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामपंचायत व आगामी जिल्हा परिषद निवडणूक आणि मध्यप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर सिमावर्ती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची बैठक बुधवारी सायंकाळी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध, अवैध दारू वाहतूक आणि इतर विषयांवर यावेळी चर्चा करून निर्णय घेण्यात आले.मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्हा आणि महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा हे सिमेवर लागून आहेत. दोन्ही जिल्ह्यांच्या आंतरराज्य सिमा तीन ठिकाणी मुख्य रस्त्याने तर चार ठिकाणी ग्रामिण रस्त्यांनी जोडल्या जातात ही बाब लक्षात घेता दोन्ही राज्यातील निवडणुकांच्या पाश्र्वभुमीवर जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांच्या संयुक्त बैठका झाल्या. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी सायंकाळी ही बैठक झाली. नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, बडवाणीचे जिल्हाधिकारी अमित तोमर, नंदुरबारचे पोलीस अधीक्षक संजय पाटील, बडवाणीचे पोलीस अधीक्षक विजय खत्री, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे, उपजिल्हाधिकारी सिमा अहिरे, लक्ष्मीकांत साताळकर, सुधीर खांदे, पोलीस उपअधीक्षक सिताराम गायकवाड, सर्व पोलीस निरिक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते. मध्यप्रदेशात नोव्हेंबर 2018 मध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्यासाठी आतापासूनच वातावरनिर्मिती सुरू झाली आहे. राजकीय हालचालीही गतिमान झाल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यात सद्य स्थितीत ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत. येत्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्याही निवडणुका होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता ही प्राथमिक बैठक घेण्यात आली. सिमा भागात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, पूर्व तयारी, अवैध दारू वाहतूक रोखणे, गौण खनिज वाहतूक रोखणे, अवैध शस्त्रस्त्रांची तस्करी रोखणे, गुन्हेगारांवर वचक ठेवणे यासह इतर विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी म्हणाले, सिमावर्ती भागावर अर्थात खेतिया, खेडदिगर, शहादा-पानसेमल रस्तावरील भामराट नाका, मंदाणे, मालकातर आदी ठिकाणी अवैध मद्य रोखण्यासाठी बडवाणी जिल्हा प्रशासनाने चेकपोस्ट तयार करावे. येणा:या-जाणा:या वाहनांची तपासणी करावी. दोन्ही जिल्ह्यातील अधिका:यांमध्ये समन्वय कायम राहावा यासाठी प्रय} करण्याचे सांगितले. नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य मिळणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.बडवाणीेचे जिल्हाधिकारी अमित तोमर यांनी कायदा व सुव्यवस्थाबाबत आढावा घेवून माहिती दिली. निवडणूक कालावधीत संबधित यंत्रणांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे असे आवाहन देखील त्यांनी बडवाणी जिल्हा प्रशासनाकडून देखील आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार असल्याचे तोमर यांनी स्पष्ट केले. सिमावर्ती बडवाणी जिल्ह्याची सिमा रस्ता मार्गासह नर्मदा नदीच्या मार्गाने देखील सिमावर्ती आहे. त्यामुळे रस्ता मार्गावर उपाययोजना करतांना नर्मदा नदी अर्थात सरदार सरोवर प्रकल्पाच्या बॅकवॉटरच्या मार्गावरून होणारी जलवाहतुकीवरही प्रशासनाला लक्ष ठेवावे लागणार आहे.या दोन्ही राज्याच्या सिमावर्ती भागातून अवैध व बनावट दारूची वाहतूक, गावठी कट्टे आणि इतर सशास्त्रे यांचीही वाहतूक व विक्री होत असते. वेळोवेळी याचे कारखाने देखील उध्वस्त करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या काळात या दोन्ही बाबींवरही नजर ठेवावी लागणार आहे.नंदुरबार जिल्हा हा मध्यप्रदेशच्या एका जिल्ह्याला तर गुजरातच्या दोन जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर नजर ठेवतांना जिल्हा पोलिसांची मोठी कसरत होत असते.
सिमावर्ती भागात समन्वय साधणार : नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 3:02 PM