ZP Election 2020: नंदुरबारमध्ये भाजपा ठरला मोठा पक्ष, पण बहुमताचा आकडा दूरच!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 01:35 PM2020-01-08T13:35:16+5:302020-01-08T13:57:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या निवडणूकीचे ५६ पैकी ४० गटांचा निकाल जाहिर झाला असून या जिल्हा परिषदेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या निवडणूकीचे ५६ पैकी ४० गटांचा निकाल जाहिर झाला असून या जिल्हा परिषदेत कुणाही एका पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे़ दरम्यान त्रिशंकूकडे वाटचाल असल्याने निकालानंतर कोणत्या पक्षांची आघाडी होते हा उत्सुकतेचा विषय आहे़ आदिवासी विकासमंत्री अॅड़ के़सी़पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी ह्या पराभूत झाल्याने काँग्रेससाठी तो मोठा धक्का आहे़
जिल्हा परिषदेचे ५६ गट व जिल्ह्यातील सहा पंचायत समितीचे ११२ गणांसाठी मंगळवारी सरासरी ६८ टक्के मतदान झाले होते़ त्याची मतमोजणी बुधवारी सकाळी १० पासून सुरु झाली़ दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे ४० गटांची मतमोजणी पूर्णत्त्वास आली असून त्यात सर्वाधिक १७ जागा भाजपाला मिळाल्या आहेत़ त्यापाठोपाठ काँग्रेसला १५, शिवसेना पाच व राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत़ उर्वरित १६ गटांची मतमोजणी बाकी आहे़ त्यातील प्राथमिक चित्र पाहता कुणाही एका पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे़
नेत्यांचे वारसदार विजयी
या निवडणूकीत जवळपास जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांचे वारसदार आपले भाग्य आजमावित होते़ त्यात ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे दोन्ही पुत्र अजित नाईक व दिपक नाईक हे विजयी झाले आहेत़ माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या कन्या अॅड़ सिमा वळवी, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचे पुत्र अभिजीत पाटील, शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी हे विजयी झाले आहेत़ सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील ह्या देखील लोणखेडा गटातून विजयी झाल्या आहेत़
अनेकांना पराभवाचा धक्का
अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे़ त्यात आदिवासी विकास मंत्री अॅड़ के़सी़पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी या तोरणमाळ ता़ धडगाव गटातून पराभूत झाल्या आहेत़ त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराने पराभूत केले आहे़ तर काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक हे खांडबारा गटातून पराभूत झाले आहेत़ जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती डॉ़ भगवान पाटील हे देखील म्हसावद गटातून पराभूत झाले आहेत़