लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयातील स्वॅब रिपोर्ट तपासणी करणाऱ्या लॅबमधील कर्मचारी कोरोनाबाधित झाले असल्याने तेथील कामकाज बंद पडले आहे़ यातून नंदुरबारचे स्वॅब रिपोर्ट रखडले असून पुन्हा नाशिक किंवा पुणे येथे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्याचे सत्र सुरु होणार आहे़गेल्या तीन दिवसांपासून पाठवले गेलेले ४९ जणांच्या स्वॅब अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही़ आरोग्य प्रशासनाकडे स्वॅब रिपोर्ट थांबवण्याबाबत विचारणा केली असता, धुळे येथील लॅबच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने तेथील कामकाज पूर्णपणे बंद झाले आहे़ परिणामी रिपोर्ट मिळू शकले नसल्याची माहिती देण्यात आली होती़ जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून १६३ वर पोहोचली आहे़ या पार्श्वभूमीवर नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या संपर्क साखळीतील रुग्णांचे स्वॅब घेऊन त्यांची तपासणी होणे गरजेचे आहे़ धुळे येथे गेल्या आठवड्यात ४९ जणांचे स्वॅॅब रिपोर्ट पाठवण्यात आले होते़ हे रिपोर्ट अद्यापही प्राप्त झालेले नाहीत़ मंगळवारी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आरोग्य संचालक यांना याबाबत विचारणा केली होती़ त्यांनी नाशिक किंवा पुणे यापैकी एका लॅबमध्ये रिपोर्ट तपासणीसाठी देण्याचे सुचवले आहे़ बुधवारी नव्याने संकलित केलेले स्वॅब रवाना करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ त्यासाठी कर्मचारी, वाहने यांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे सहा जणांचा मृृत्यू झाला आहे. जिल्ह्यातून १ हजार ९५२ जणांचे स्वॅब घेण्यात आले आले आहेत़ यातील १ हजार ७१९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षात सध्या ८४ कोरोनाबाधित उपचार घेत असल्याची माहिती आहे़
नंदुरबारचे स्वॅब पुन्हा जाणार पुणे किंवा नाशिकच्या लॅबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 11:53 AM