तळोदा : सेंद्रीय शेती, भ्रष्टाचार मुक्तता, व्यसनमुक्ती बरोबर मोठय़ा प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा संकल्प अकरा वसाहतींमधील विस्थापितांनी आशिषनगर (काथर्देदिगर) वसाहतीत संकल्प स्तंभासमोर केला. याशिवाय संघर्षही अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. दरम्यान, मणिबेली येथे गुरूवारी ‘नर्मदा की पुकार’ यात्रेचा समारोप करण्यात आला.गेल्या वर्षी 31 जुलै 2017 रोजी नर्मदेच्या बुडीत क्षेत्रातील गावे खाली करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. परंतु अजूनही मध्यप्रदेश, महाराष्ट्र अन् गुजरात या तिन्ही राज्यातील शासनाने आदर्श पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. आजही शेकडो कुटुंबे या ठिकाणी आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी 31 जुलै पासून मध्यप्रदेशातील निसरपूर येथून विस्थापितांकडून ‘नर्मदा की पुकार’यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा समारोप गुरूवारी मनिबेली येथे करण्यात आला. तत्पूर्वी गुरूवारी आशिषनगर अर्थात काथर्देदिगर वसाहतीत संकल्प कार्यक्रम घेण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर निवृत्त न्यायाधीश प्रभाकरण, पर्यावरण तज्ज्ञ सौम्य दत्त, विमलभाई, उमेश तिवारी, माजीमंत्री अॅड.पद्माकर वळवी, मेधा पाटकर, विजया चौहाण, डॉ.सुहास कोल्हेकर, प्रसाद बागवे, सुहास नाईक, गुड्डी बहन, युसूफ मेहरअली, शनावर बी, नाथ्याभाऊ पावरा, मान्या पावरा, गंभीर पाडवी, किरसिंग वसावे, धरमसिंग वसावे, लालसिंग वसावे, मांगल्या पावरा, सियाराम पाडवी, गंभीर पावरा, नुरजी वसावे, नुरजी पाडवी, गिरधर पावरा, ओरसिंग पाडवी, खेमसिंग पावरा, लतिका राजपूत, शामजी पाडवी, मंगला पावरा, विश्रांती वळवी आदी उपस्थित होते.सरदार सरोवर प्रकल्पातील विस्थापितांच्या पुनर्वसनाबाबत नर्मदा बचाव आंदोलन गेल्या अनेक वर्षापासून लढत आहे. त्यामुळे बाधितांचे पुनर्वसनाबरोबरच जमिनीचा प्रश्नही सोडण्यास मदत झाली आहे. तरीही अजूनही हजारो कुटुंबाचे पुनर्वसन बाकी आहे. आजही ते मुळगावी राहत आहे. त्यामुळे संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख सर्व उपस्थितांनी पुनर्वसनाबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर विस्थापितांच्या संकल्पासाठी उभारण्यात आलेल्या संकल्पस्तंभापुढे सर्व 11 वसाहतींमधील विस्थापितांनी संकल्प केला. त्यांनी रासायनिक शेती न करता सेंद्रीय शेती करून सातपुडय़ाच्या हिरवाईसाठी मोठय़ा प्रमाणात वृक्ष करण्याचा संकल्प करण्यात आला. त्याचबरोबर समाजातील संपूर्ण व्यसनमुक्ती, भ्रष्टाचाराची मुक्ती करण्याचाही संकल्प घेण्यात आला. या वेळी पुनर्वसन गावामधील सर्व महिला सरपंचाचाही सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन साळवे यांनी केले. दरम्यान, या आंदोलनाचा समारोप मणिबेली येथे करण्यात आला.
नर्मदा की पुकार संघर्ष यात्रेचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 12:08 PM