नर्मदेचे आरक्षीत पाणी नंदुरबार जिल्ह्यालाच मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 1:13 PM
सातपुडय़ाचा गाळप हंगामाचा शुभारंभ : जलसंपदा मंत्री व पालकमंत्र्यांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सुरू असलेले कारखाने बंद पाडून ते विकत घेण्याचा धंदा गेल्या काळात काहींनी केला. सहकार चळवळ मोडीत काढण्यात आला, परंतु अडचणीतून मार्ग काढत सातपुडा सक्षमपणे सुरू आहे. त्याचे कौतूक करीत नर्मदेचे आरक्षीत पाणी जिल्ह्यालाच मिळेल ते कुठेही वळविले नसल्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सातपुडा साखर कारखाना गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलतांना दिली.सातपुडा साखर कारखान्याचा 43 वा गळीत हंगामाचा शुभारंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शनिवारी झाला. कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, उद्योगपती सरकार रावल, अपर जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक संजय पाटील, माजी आमदार रामकृष्ण पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, शिंदखेडा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, शहादा बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रेमसिंग अहेर, दूध संघाचे चेअरमन रवींद्र राऊळ उपस्थित होते.स्व.पी.के. अण्णांच्या कार्याचा गौरव करून गिरीश महाजन म्हणाले की, कारखानदारी मोडीत काढणे सोपे असते मात्र टिकविणे कठीण असते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पी.के. अण्णांनी सहकाराच्या माध्यमातून कारखाना उभा केला. कारखान्याच्या माध्यमातून इतर सहकारी प्रकल्प उभारून शेतकरी हिताचे मोठे काम उभे केले. राज्य सरकार हे शेतक:यांच्या हिताचे काम करीत आहे. सातपुडा कारखान्याच्या बंद पडलेल्या 22 उपसा सिंचन योजनांची कामे येत्या 15 दिवसात सुरू होतील आणि नर्मदा खो:यातील आरक्षित संपूर्ण 5.5 टीएमसी पाणी नंदुरबार जिल्ह्यालाच मिळेल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. तापी-बुराई, सुलवाडा-जामखेल आदी खान्देशातील सर्व प्रकल्प येत्या 10 वर्षात पूर्ण होऊन खान्देशचा कायापालट पूर्ण करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. शासन नेहमी शेतक:यांच्या पाठीशी असून शेतक:यांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची आणि येत्या 10 वर्षात खान्देशचा कायापालट करण्याची ग्वाही त्यांनी दिली. नर्मदा खो:यातील आरक्षित पाणी नंदुरबार जिल्ह्यालाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनीही पी.के. अण्णा पाटील यांचे कार्य इतरांना प्रेरणास्त्रोत असल्याचे सांगून पी.के. अण्णांशी आपल्या परिवाराचे तीन पिढय़ांचे संबंध आहेत. अण्णांनी शहादा परिसरात सहकाराचे जाळे विणून शेतकरी उभा केला, आदर्श संस्था निर्माण केल्याचे सांगितले. राजकारणात मतभेद असतात मात्र विकासात सर्वानी एकत्र येणे आवश्यक असल्याने आपण सातपुडा साखर कारखान्याचे आमंत्रण स्वीकारले. कारखान्याच्या माध्यमातून शेतक:यांचा विकास साधला जातो, परिसराचा आर्थिक विकास होतो, राज्याला महसूल मिळतो म्हणून कारखानदारी जीवंत राहिली पाहिजे. तालुक्याच्या विकासासाठी सातपुडा चालला पाहिज असेही रावल यांनी सांगितले.कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील म्हणाले की, शासनाची कोणतीही मदत न घेता परिसरातील व्यापारी, पतसंस्था, शेतकरी यांच्या आर्थिक सहयोगातून कारखाना सुरू आहे. विविध कारणांनी मधल्या काही काळात कारखाना बंद पडला. मात्र नंतर सभासद, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने कारखाना पुन्हा सुरू झाला. शेतक:यांनी इतर कारखान्याच्या कोणत्याही अमिशाला बळी न पडता कारखान्यास ऊस पुरविण्याचे आवाहन दीपक पाटील यांनी केले. विजय चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी तर सूत्रसंचालन के.डी. पाटील यांनी केले. कार्यक्रमास हैदरअली नुरानी, विजय विठ्ठल पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, सरपंच ज्योती पाटील, माधव पाटील आदी उपस्थित होते.