लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद निवडणुकीत 'जे झालं ते गंगेला न्हाल' असे समजून पुन्हा कार्यकर्त्यांनी नव्या दमाने पक्ष कार्यासाठी लागावे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रभारी अनिल गोटे यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी व्यासपीठावरील पदाधिकारी व उपस्थित कार्यकर्त्यांनी हात उंचावून पक्षाशी प्रामाणिक राहण्याच्या निर्धार केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी भगवती लॉन्स येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी केले. व्यासपीठावर निरीक्षक नाना महाले,अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश सचिव मुख्तार शेख, जितेंद्र मराठे, राजू पाटील, माधव चौधरी, दादा कापडणीस, सुरेंद्र कुवर, पुष्पा गावित, अश्विनी जोशी, जगदीश माळी आदी उपस्थित होते. प्रसंगी,डॉ. अभिजित मोरे, शांतीलाल साळी, उपसरपंच डी.जी मोरे, अभियंता बी.के पाडवी, राणूमल जैन आदींनी यांनी मनोगत व्यक्त केले.मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना अनिल गोटे म्हणाले, कार्यकर्त्यांनी विरोधाभास सोडून समाजासाठी कार्य करावे. पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे कुठलाही व्यक्ती काम घेऊन आला तर त्याची निराशा होऊ नये. जोपर्यंत त्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत मदत करा. असे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणुकीत पराभव झाला. पराभवाने घाबरून जाऊ नये. मी कार्यकर्त्यांच्या पराभव सहन करेन पण लज्जास्पद पराभव सहन करणार नाही. कार्यकर्त्यांनी घरावर झेंडे लावून वातावरण निर्मिती करून गाव तेथे राष्ट्रवादीचे शाखा उघडण्यात यावी अशा सूचना अनिल गोटे यांनी केल्या.डॉ.विजयकुमार गावित यांना आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनी मंत्री बनविले होते. आदिवासी विकास विभागाला नऊ टक्के निधी देऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास केल्याची माहिती निरीक्षक नाना महाले यांनी दिली. पक्ष कोण सोडून गेलं याचा विचार न करता कार्यकर्त्यांनी पक्षकार्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.