सुनील सोमवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : आधार योजनेच्या शुभारंभाने संपूर्ण भारतात प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शहादा तालुक्यातील टेंभली गावाची अवस्था ‘जैसे थे’ झाल्याने टेंभलीकर एक स्वप्न म्हणून आठ वर्षापूर्वीच्या त्या घटनेकडे पहात आहेत.29 सप्टेंबर 2010 रोजी देशातील महत्वाकांक्षी ‘आधार’ योजनेचा शुभारंभ तत्कालिन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग आणि युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते मोठय़ा धुमधडाक्यात झाला होता. यानिमित्ताने स्वातंत्र्याच्या सहा दशकानंतर ख:या अर्थाने टेंभली येथे स्वातंत्र्याची पहाट उगवली होती. सुमारे दीड हजार लोकवस्तीच्या या दुर्लक्षित आदिवासी गावात प्रथमच शासनाचे लक्ष गेले. कंदील आणि चिमणीच्या प्रकाशात धूसर दिसणा:या या गावात ‘आधार’च्या निमित्ताने राजीव गांधी विद्युतीकरण योजनेतून झोपडी-झोपडीत वीज पोहोचली. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून गावात रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले, गटारी झाल्या, गावास रंगरंगोटी झाली, संपूर्ण गावाचे रुपच पालटल्याने टेंभलीच्या आदिवासी बांधवांना प्रथमच स्वातंत्र्याची जाणीव झाली. ग्रामस्थांचा आनंद गगनाला पोहोचला. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. अवघ्या दोन वर्षातच गावातील वीज गुल झाली. झोपडीतील विजेचे मीटर काढून घेण्यात आल्याने टेंभलीत पुन्हा कंदील आणि चिमणीचा धूसर प्रकाश पोहोचला.आज आठ वर्षानंतर टेंभलीची अवस्था देशातील इतर छोटय़ा खेडय़ांसारखीच झाली आहे. गावातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. अंगणवाडीचे काम अपूर्ण असल्याने ग्रामपंचायत कार्यालयात सध्या अंगणवाडी भरते. एक बोअरवेल आणि केवळ दोन हातपंप सुरू असून टेंभलीचा पाणीपुरवठा एवढय़ावरच आहे. गटारींची कामे अपूर्ण आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना रॉकेल मिळालेले नाही. रेशन घेण्यासाठी लोणखेडा येथे जावे लागते. रेशन दुकानदार मनमानी करीत असल्याने नियमित व पुरेसे रेशन मिळत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. शासनाच्या योजना गावार्पयत पोहोचत नाही. पोहोचल्या तरी लाभ मिळविण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. ग्रामसेवक नियमित येत नसल्याने मुलांचे दाखले आणि शासकीय कागदपत्र मिळविण्यासाठी ग्रामस्थांना ग्रामसेवकांची प्रतीक्षा करावी लागते.‘आधार’च्या शुभारंभाप्रसंगी शहाद्याच्या तलाठय़ांपासून ते दिल्लीच्या सचिवांर्पयत सर्वच अधिकारी आणि कर्मचा:यांनी टेंभलीची वारी केली होती. आज मात्र टेंभलीचा कोणीही वाली नसल्याने टेंभली पुन्हा पूर्वपदावर आले आहे. ‘आधार’ या मोठय़ा योजनेची सुरूवात टेंभलीपासून झाल्याने भारतभर टेंभलीचे नाव पोहोचले असले तरी गावाला मात्र याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे तुकाराम टिकाराम पवार यांनी हताशपणे सांगितले. रवींद्र माळी या युवकानेदेखील टेंभलीतील समस्यांचा पाढा वाचत आम्हाला किमान रेशन दुकान गावातच देण्याची मागणी केली. लोणखेडय़ास रेशन घेण्यासाठी भाडे खचरून रिक्षाने जावे लागते. रेशन मिळाले तर ठिक नाही तर फेरी वाया जात असल्याचे त्याने सांगितले. आठ वर्षापूर्वी लाखो रुपयांचा निधी खर्च करून टेंभलीत सर्व शासकीय योजना पोहोचल्या होत्या. रस्ते, वीज, पाणी, शाळा, गटारी, रेशन, रॉकेल, सार्वजनिक स्वच्छतागृहे, घरकूल सारेच टेंभलीकरांना मिळाले होते. मात्र शुभारंभ करून डॉ.मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांची पाठ फिरताच शासकीय अधिका:यांनीही टेंभलीकडे पाठ फिरवल्याने 29 सप्टेंबर 2010 चे ते एक सुंदर स्वप्न होते, असे ग्रामस्थांना वाटते.
‘आधार’चा देशव्यापी शुभारंभ एक स्वप्नच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:29 PM