लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विश्व मुळनिवासी दिनानिमित्त भर पावसात जिल्हाभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नंदुरबार व तळोदा येथे भर पावसात रॅली काढण्यात आल्या. यावेळी युवकांचा उत्साह मोठा होता. विश्व मुळनिवासी दिनानिमित्त शुक्रवारी जिल्हाभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी आदिवासी क्रांतीकारकांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. आदिवासींची देवता याहामोगी माता यांचे पूजन करून कार्यक्रमांना पारंपारिक पद्धतीने सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी जिल्हाभरात मुसळधार पाऊस सुरू असतांना देखील आदिवासी बांधवांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. नंदुरबारात विविध संघटना व संस्थांनी रॅली काढल्या. आपापल्या भागातून काढण्यात आलेल्या या रॅलींमध्ये डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती. अनेकांनी आपल्या आदिवासी परंपरागत वेशभूषा केल्या होत्या. महिला व युवतींचा सहभाग देखील मोठा होता. तळोद येथे देखील सकाळी रॅली काढण्यात आली. रॅलीत शहरासह परिसरातील गावांमधील युवक देखील मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. दोन ते तीन तास चाललेल्या या रॅलीत आदिवासी बांधवांनी पारंपारिक नृत्य देखील सादर केले.शहादा येथे देखील रॅलीसह प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच शहाद्यात उत्साह होता. याशिवाय धडगाव, अक्कलकुवा, नवापूर येथेही आदिवासी बांधवांनी विश्व मुळनिवासी दिनाचे कार्यक्रम आयोजित केले.
मुळनिवासी दिनानिमित्त धो धो पावसातही रॅलीचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:22 PM