लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवघ्या आठवडाभरावर आलेल्या मकरसंक्रांतीनिमित्त नंदुरबारात पतंगोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. यामुळे नंदुरबारला पतंग, दोरा, चक्री, मांजा आदी साहित्य खरेदी-विक्री जोमात सुरू आहे. दरम्यान, नॉयलॉन आणि चायना मांजा अर्थात दोरावर बंदी असतांनाही त्याची सर्रास विक्री होत आहे. यामुळे अनेकांना जायबंदी व्हावे लागत आहे. नंदुरबारातील पतंगोत्सवाचे वेध गेल्या 15 दिवसांपासून लागले आहेत. सकाळ व सायंकाळी आणि सुटीच्या दिवशी दिवसभर घरांच्या गच्चीवर शेकडो युवक पतंग उडवितांना दिसून येतात. दरवर्षी पतंग-दोरा व्यवसायातून एक कोटीच्या आसपास उलाढाल होत असते. यावर्षी साधारणत: 20 टक्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. नंदुरबारला मंगळबाजारासह अमर, अमृत सिनेगागृह परिसर, हाटदरवाजा, सिंधी कॉलनी, स्टेशनरोड, गणपती मंदिर या भागात पतंगाची दुकाने थाटली जातात. यावर्षी चायना मेडपासून निर्मित पतंग, दोरा, चकरीला विशेष मागणी आहे. नॉयलॉन दो:यावर बंदी असतांनाही बाजारात त्याची मोठय़ा प्रमाणावर विक्री होत आहे. यामुळे गेल्या आठवडय़ापासून अनेकजण जायबंदी होत आहे. तळोदा येथे तर एकाचा गळा चिरला गेल्याची घटना घडली. टिकावू आणि प्रतीस्पर्धीची पतंग काटण्यासाठी हा दोरा अधीक मजबूत मानला जातो. त्यामुळे त्याला मागणी अधीक असते. परंतु या दो:याच्या विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.काच, सरस, रंग आणि इतर साहित्याद्वारे रिळ बनविला जातो. यंदा 24 कॅरेट, आरडीएक्स, बाजीगर, गेंडा, बियर, चॅलेंज, अगिA, ग्रिफीन, एसपीथर्ड, मोनोकाईड, एस. पॉवर, आयबीके गोल्ड प्रकारातील दोरा बाजारात उपलब्ध आहे.नंदुरबार शहर व जिल्ह्यात दरवर्षी पतंग आणि दोरा व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते. दरम्यान, दोरा बनविण्यासाठी विशिष्ठ पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. यात सायकलची दोन चाके एका लाकडी फ्रेमला बसवून काही मिनिटात हजारो वार लांबीचा दोरा तयार होतो. तसेच काही मिनिटात चकरीमध्ये दोरा काच, सरस आणि रंग मिसळून तो तत्काळ गुंफला जातो. यासाठी वीजेवर चालणारी मोटार जोडली जाते. त्यामुळे घंटो का काम मिनिटो मे करून देण्याची तयारी विक्रेत दाखवितात.या विक्रेत्यांनी वीज नसल्यास जनरेटस्ची सुविधा ठेवली आहे. मात्र ते परवडणारे नसल्याने वीज नसल्यास हाताने चाके फिरवून दोरा तयार केला जातो. या कामात विक्रेत्यांच्या घरातील महिला, गृहिणी तसेच महाविद्यालयीन युवती देखील मदत करतात. येत्या आठवडय़ात विक्रीस आणखी वेग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नंदुरबारात नॉयलॉन मांजामुळे अनेक जायबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:31 PM