संडे स्पेशल मुलाखत-
रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून रिक्त असलेले राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी अखेर डॉ.अभिजीत मोरे यांची निवड झाली आहे. या निवडीने जिल्ह्यातील राजकारणात आता नव्याने समिकरणे बदलणार आहेत. दरम्यान, जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यापासून २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका हेच आपले लक्ष असून त्या कामाला आतापासूनच सुरुवात केल्याची माहिती डॉ.अभिजीत मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.आपली राजकारणाची नवी दिशा कशी राहणार?माझ्या घराण्याला राजकारणाचा वारसा आहे. यापूर्वी आपले वडिल स्व.दिलिप मोरे व आजी स्वातंत्र्य सेनानी स्व.कमलाताई मराठे यांनी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची धूरा यशस्वीपणे सांभाळली. आपणही युवक राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष होतो. आपल्या आजीच्या कारकिर्दीत राष्टÑवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर पोहचला होता. नंतरच्या काळात संघटनात्मक बांधणी खिळखिळी झाली होती. पण आता पुन्हा नव्या दमाने कामाला सुरुवात करून राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील पूर्वीचे वैभव परत आणण्याचा संकल्प आहे. आपण सूत्रे स्विकारल्यापासून कामाला सुरुवात केली असून त्या दृष्टीने जिल्हाभर पक्षाची नव्याने बांधणी करणार आहोत.पक्षातील गटबाजीचे चित्र नेहमीच चर्चेत राहिले आहे ते कसे मिटविणार?पक्षात गटबाजी नव्हती. खरेतर जिल्हाध्यक्षपदासाठी स्पर्धा होती हे निश्चित ही स्पर्धा म्हणजे गटबाजी म्हणता येणार नाही. माझी नियुक्ती झाली तेंव्हापासूनच स्पर्धाही संपली असून किरकोळ मतभेद असतील तेही मिटले आहेत. माझ्या नियुक्तीनंतर सर्वच जण आम्ही एकत्र भेटलो असून संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने विचार केला आहे. त्यामुळे पक्षात कुठलेही मतभेद अथवा गटबाजी नाही. सर्व जण एकदिलाने काम करणार आहोत.‘मिशन २०२४’ च्या नियोजनासंदर्भात डॉ.अभिजीत मोरे यांनी सांगितले की, आजपासूनच आम्ही जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात व लोकसभा मतदारसंघात पक्ष बांधणीसाठी काम करणार आहोत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही सर्व व्यूहरचना असणार आहे. पुढे पक्षाच्या आदेशानुसार विधानसभा मतदारसंघ व लोकसभा निवडणुकीचे नियोजन करण्यात येईल. त्यावेळी कुठे निवडणूक लढवावी त्याची दिशा स्पष्ट होईल.केवळ लोकसभा व विधानसभा निवडणुकाच नव्हे तर ग्रामपंचायतीपासून नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही राष्टÑवादी काँग्रेस पक्ष सक्षमपणे निवडणूक लढवू शकेल असे नियोजन राहणार आहे. मध्यंतरीच्या काळात कोण पक्ष सोडून गेले, त्याचे विचार करण्यापेक्षा पक्षात अनेक नवीन कार्यकर्ते येऊ इच्छित आहेत. त्याबाबत विचार करू.