लोकमत न्यूज नेटवर्कजयनगर : शहादा तालुक्यातील जयनगर परिसरात सध्या पपई, केळी, कापूस, मिरची आदी पिके काढण्याचे काम सुरू आहे. हा माल व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन घेऊन जातात. पण बऱ्याचवेळा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याच्या घटना नंदुरबार जिल्ह्यात घडत आहेत. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी स्थानिक व बाहेरील व्यापाऱ्यांना परवाना देण्याची आवश्यकता आहे. त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना शेतकऱ्यांकडून देण्यात आले.कोरोना विषाणू संसर्गामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यात व्यापाऱ्यांकडून झालेल्या फसवणुकीची भर पडल्याने शेकरी अधिकच अडचणीत येत आहेत. काही लोक व्यापारी असल्याचा बनाव करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून पपई, केळी, कापूस, मिरचीची खरेदी करून पैसे चुकते न करताच पसार होण्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यात केळी, पपई, कापूस, मिरचीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. केळी, पपई, कापूस घेण्यासाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचतात व शेतमाल खरेदी करतात. शेतकऱ्यांनाही आपला माल मार्केटपर्यंत घेऊन जाताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामध्ये वाहनाचे भाडे, मजूर शोधणे व त्यांची मजुरी अशा गोष्टींना सामोरे जावे लागते. म्हणून शेतकरी आपला शेतमाल व्यापाऱ्यांना मनमोकळेपणाने देतात. काही व्यापारी सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांशी जवळीक साधून त्यांचे पैसे वेळेवरही देतात. परंतु काही दिवसानंतर जास्त माल घेऊन थोडेफार पैसे देऊन उर्वरित पैसे नंतर देऊ, असे सांगतात. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना जास्त दिवस झाल्यावरही पैसे मिळत नाही. अशाप्रकारे व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करतात. नंतर शेतकरी पैसे मागायला गेले की, ‘पेमेंट मिला नही, बँक बंद है, मेरे पे विश्वास नही क्या, पार्टी से पेमेंट नही आया, आते ही देता हू’ अशी उत्तरे देऊन शेतकऱ्यांना फिरवत असतात. शेतकऱ्यांचे जास्त प्रमाणात पैसे घेणे झाले की काही व्यापारी पळूनही जातात व दुसरीकडे वास्तव्य करून परत तेथे हेच धंदे त्यांचे चालू होतात. अशा परिस्थितीमुळे शेतकरी अगोदरच कर्जबाजारी असतो आणि त्यातून व्यापार्यांनी दिलेला धोका व त्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला कमी भाव देऊन व्यापारी आपले खिसे भरत असल्याने शेतकरी खचून जातो. हे प्रकार थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून या व्यापाऱ्यांना परवाना दिल्यास त्यांच्यावर नियंत्रण राहील. याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून या मागणीचे निवेदन दिले. या वेळी डॉ.कांतीलाल टाटीया, महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी, शेतकरी सुदाम पाटील, राजेंद्र माळी, चतुर पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांची प्रशासनाकडे नोंद होणे आवश्यकजिल्ह्यात कोणीही परप्रांतीय व्यापारी शेतमाल खरेदी करायला येत असेल तर सगळ्या व्यापाऱ्यांना परवाना आवश्यक अथवा काही संलग्नित महत्त्वाचे कागदपत्र किंवा व्यापाऱ्यांच्या परिचयाची नोंद असलेली महत्वपूर्ण माहिती जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करुन या व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या नियंत्रणात या जिल्ह्यात व्यापार करू द्यावा. जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होणार नाही. तसेच व्यापाऱ्यांना परवाना आवश्यक केल्याने व्यापाऱ्यांची संख्याही कमी होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भावही अधिक मिळेल. ज्या व्यापाऱ्यांकडे परवाना नसेल अशा व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनीही माल देऊ नये.