प्रकाशा : शहादा ते प्रकाशा दरम्यान डामरखेडा गावाजवळ गोमाई नदीवरील पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाचे संरक्षक कठडे पूर्णपणे तुटले असून पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ात अवजड वाहन आदळले तर पूल हलतो, अशी स्थिती आहे. त्यामुळे संबंधित विभागाने काही दुर्घटना घडण्याअगोदरच पुलाची दुरुस्ती करण्याची गरज आहे.शहादा तालुक्यातील डामरखेडा गावाजवळ गोमाई नदीवर सुमारे 40 वर्षापूर्वी पूल बांधण्यात आला आहे. या पुलाला दोनवेळा महापुराचा जबरदस्त तडाखा बसला आहे. आजच्या स्थितीत पुलाची अवस्था फारच बिकट झाली आहे. पुलाचे संरक्षक कठडे सिमेंटचे असून ते पूर्णपणे तुटले आहेत. या कठडय़ांना धक्का लावताच ते पडतील की काय अशी स्थिती आहे. पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांमध्ये अवजड वाहन आदळले तर पूल अक्षरश: हलतो. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलावर पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी पाईप काढण्यात आले आहेत. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूला व या पाईपांजवळ माती साचल्याने पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही. पाऊस झाल्यावर या पुलावर पाण्याचे डबके साचतात. त्यातच खड्डे असल्याने वाहने आदळून अपघातही होतात. पुलाच्या दोन्ही टोकाला अर्धवट भिंती बांधलेल्या आहेत. या भिंतींना तडे पडून त्या तिरकस झालेल्या आहेत. पूल ज्या खांबांवर उभा आहे त्या खांबांच्या लोखंडी सळ्याही बाहेर आलेल्या आहेत.या पुलाची पडझड झाली तर या मार्गावरील वाहतूक बंद होऊन नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल. वाहनचालकांना 70 ते 80 किलोमीटरचा फेरा मारून शहादा, सारंगखेडा, कोपर्ली, नंदुरबारमार्गे वाहतूक करावी लागेल. अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून संबंधित विभागाने या पुलाची चांगल्याप्रकारे डागडूजी व दुरुस्ती करण्याची गरज आहे.
डामरखेडय़ाजवळील पुलाच्या दुरुस्तीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:41 PM