लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या दोन दिवसांपासून चिंतेत असलेल्या शहरवासीयांना रविवारी दिलासा मिळाला. कोरोना संसर्गित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे पाठविण्यात आलेल्या ३५ पैकी १९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अक्कलकुव्यातील दोन जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. यामुळे प्रशासनासह सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. उर्वरित नमुन्यांच्या अहवालाकडे आता लक्ष लागून आहे.रविवारी दिवसभर जिल्हा प्रशासनाला अहवालांची प्रतिक्षा होती. सर्वांच्याच मनात भिती देखील होती. अखेर सायंकाळी नमुन्यांचा अहवालांचा मेल जिल्हा रुग्णालयाला मिळताच सर्वांना हायसे वाटले. प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आलेल्या २१ संशयित व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. यापैकी चार व्यक्ती कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील आहेत, या सर्व व्यक्तींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली.एकूण ३५ संशयित व्यतींच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी २१ निगेटीव्ह आले आहेत. निगेटीव्ह रुग्णापैकी वडफळी आणि अंबाबारी येथील सात व्यक्ती असून अलीशाह मोहल्ला भागातील इतर दोन व मेडिकेअर हॉस्पिटलच्या तीन व्यक्तींचा यात समावेश आहे. १४ संशयित व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.संशयित रुग्णांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी होत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णावर निधार्रीत पद्धतीनुसार उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. प्रशासनातर्फे शहरातील भाग क्र.१० सील करण्यात आला असून या भागात दिवसातून पाचवेळी फवारणी करण्यात आली आहे.कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून शहरातील सर्व व्यवहार तीन दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू आहेत. मात्र भाजीपाला, फळे विक्रीवर २० तारखेपर्यंत बंदी राहणार आहे. २० एप्रिलनंतर काही निर्बंध शिथिल होणार असले तरी कंटेंटमेंट झोनमधील कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाण्याची अनुमती असणार नाही.
कोरोना रुग्णाच्या संपर्कातील १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:11 PM