नंदुरबार : : पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केल्यानंतर आता या मार्गावर प्रवासी गाडय़ांची संख्या वाढू लागली आहे. मुंबई-सुरत-अहमदाबाद या व्यस्त रेल्वे लाईनवरील अनेक प्रवासी गाडय़ा आता नंदुरबार, भुसावळमार्गे वळविण्यात येत आहे. दरम्यान, नंदुरबार-उधना व उधना-जळगाव अशा दोन नवीन मेमू ट्रेन देखील लवकरच या मार्गावर सुरू होणार आहेत. मुंबईसाठी देखील बांद्रा-मुंबई ही एक्सप्रेस नंदुरबारमार्गे सुरू होत आहे.पश्चिम व मध्य रेल्वेला जोडणारा महत्वाचा ठरलेला सुरत-भुसावळ रेल्वे मार्गाचे नुकतेच दुहेरीकरण पुर्ण झाले आहे. या मार्गावरील रेल्वे वाहतुकीचा कमी भार लक्षात घेता व्यस्त रेल्वे मार्गावरील अनेक प्रवासी गाडय़ा या मार्गावर आता वळविण्यात आल्या आहेत. काही नवीन प्रवासी रेल्वेगाडय़ा देखील सुरू करण्यात येत आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला जिल्ह्यातील लोकांचे सुरत, वापी, बलसाड, उधनाशी नाते जोडले गेले आहे. या जिल्ह्यंमधील अनेक कुटूंबे वर्षानुवर्ष सुरत, उधना या भागात उद्योगधंदे, रोजगारानिमित्त स्थायिक झाले आहेत. त्यामुळे भुसावळ-सुरत या पॅसेंजर रेल्वेला नेहमीच मोठा प्रतिसाद असतो. ही बाब लक्षात घेता या मार्गावर सर्वसामान्यांना प्रवास दर परवडेल अशा पद्धतीने नवीन रेल्वेगाडय़ा देखील सुरू करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने दोन नवीन मेमू ट्रेन येत्या काळात सुरू होत आहेत.सुरत-नंदुरबार ही मेमू ट्रेन गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. रात्री साडेअकरा वाजता ही मेमू ट्रेन नंदुरबारला येते. पहाटे 2.20 वाजता ती सुरतकडे रवाना होते. या प्रवासी गाडीला मोठा प्रतिसाद आहे. या व्यतिरिक्त आता आणखी दोन मेमू ट्रेन या मार्गावर सुरू होत आहेत. त्यात उधना-नंदुरबार व उधना-जळगाव या मेमू ट्रेनचा समावेश आहे. उधना-नंदुरबार ही ट्रेन सकाळी 6.25 वाजता उधनाहून निघेल व 12.15 वाजता नंदुरबारला पोहचणार आहे. तर नंदुरबारहून दुपारी 1 वाजता उधनाकडे रवाना होईल. याशिवाय उधना-जळगाव ही ट्रेन सकाळी 10.20 वाजता निघेल तर जळगावहून मध्यरात्री 12.45 वाजता उधनाकडे निघणार आहे. दररोज ही ट्रेन धावणार आहे. एकुण सर्वसाधारण श्रेणीच्या 12 डब्यांची रेल्वे राहणार आहे. याशिवाय गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या मुंबईसाठीच्या नवीन एक्सप्रेसला देखील मंजुरी मिळाली असून लवकरच ती धावणार आहे. बांद्रा-भुसावळ अशी ही एक्सप्रेस राहणार आहे. ती दररोज धावणार असून तिचे शेडय़ूल देखील तयार करण्यात आले आहे. ही एक्सप्रेस उधना व सुरत स्थानकांवर न जाता चलथानपासून मुंबई-दिल्ली रेल्वेमार्गाला जोडून भेस्तानमार्गे मुंबईकडे जाणार आहे. यामुळे जळगाव, अमळनेर, नंदुरबारहून मुंबईकडे जाणा:या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय येत्या काळात आणखी काही नवीन प्रवासी रेल्वेगाडय़ा या मार्गावरून धावणार असून त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
ताप्ती सेक्शनवर नव्याने दोन मेमू ट्रेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 6:27 PM